वर्धा: इतिहासातील पाने चाळताना काही बाबी आजही प्रासंगिक वाटतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाते एका घटनेने जुळले होते. १९३५ मध्ये महाराजांनी वयाच्या २६ व्या वर्षी अभूतपूर्व असा सालबर्डी यज्ञ केला होता. त्याबाबत काहींनी तक्रार केली. एक युवक विदर्भात बुवाबाजी करीत असल्याची तक्रार झाल्यावर त्यातील तथ्य तपासावे म्हणून गांधीजींनी स्वतः पत्र पाठवून महाराजांना बोलावून घेतले.

महाराज एक महिन्याच्या वास्तव्यासाठी १३ जुलै १९३६ रोजी सेवाग्राम आश्रमात पोहचले. १४ ऑगस्ट पर्यंत त्यांचा मुक्काम होता. इथूनच पुढे राष्ट्रसंतांनी आपल्या खंजेरीच्या निनादात स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग सुरू केला. या घटनेस आता ८७ वर्ष पूर्ण होत आहे. या भेटीचा इतिहास जागवितानाच त्यातून पुढे नवी पिढी कशी घडली, याची माहिती देण्यासाठी महापुरुषांचा जागर हे अभियान सुरू होत आहे.

हेही वाचा… आंतरराज्यीय तस्करांचे तार गोंडपिपरीत; छत्तीसगडच्या वनपथकाकडुन गोंडपिपरीतून एकाला अटक

विविध गावात प्रचारक मंडळी शाळेत भेट देतील. विचार दर्शन घडवितील, अशी माहिती सुरेंद्र बेलुरकर यांनी दिली आहे. सेवाग्राम येथील रामकृष्णदादा बेलूरकर फिरते वाचनालय हे अभियान तुळजापूर ते सेवाग्राम दरम्यान राबवतील. यात ग्रामगीताचार्य शंकरराव मोहोड, विजय मंथनवार, सचिन सावरकर,बबनराव गोलाईत,प्रकाश अलवडकर,प्रवीण देशमुख,राजेंद्र जिकार,चेतन परळीकर,मेहबूब भाई, प्रफुल्ल अंबुळकर, विजय कोल्हे व अन्य सहभागी होणार.