२०२१-२२ या वर्षात देशभरातील बँकांच्या स्वत:च्या तपासणीत दोन हजाराच्या १३ हजारांवर बनावट नोटा सापडल्या आहेत. यापेक्षा अधिक संख्येने पोलिसांनी देशभरात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत जप्त केल्या आहेत. ही संख्या लाखोंच्या घरात आहे.
केंद्र शासनाने यासंदर्भात संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सादर केलेल्या माहितीनुसार २०२१-२०२२ मध्ये, बँकांच्या स्वत:च्या तपासणीत दोन हजार रुपयांच्या १३,६०४ बनावट नोटा सापडल्या. मात्र, २०२१-२२ च्या तुलनेत २०१८-१९ ते २०२०-२१ या दरम्यान हे प्रमाण कमी झाल्याचा दावा सरकारने केला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) तपशीलानुसार २०१८ते २०२० दरम्यान देशात पोलिसांनी विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात सापडलेल्या बनावट नोटांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. २०१८ मध्ये ५४,७७६, २०१९ मध्ये ९०,५६६ तर २०२० मध्ये २,४४,८३४ दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा: अनेकांच्या परिश्रमामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले – नितीन गडकरी
२०१६ मध्ये नोटाबंदी केल्यानंतर सरकारने दोन हजार रुपयांची नवी नोट चलनात आणली होती. मात्र, त्याच्याही बनावटी नोटा तयार करण्यात आल्याचे खुद्द बँकांच्याच तपासणीत निदर्शनास आले आहे. बनावट नोटांची तस्करी आणि प्रसार रोखण्यासाठी सरकारने कायदा केला आहे. तपास यंत्रणाच्या मदतीनेही शोध घेतला जातो. तस्करीवर आळा घालण्यासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यात करार झाला आहे. याशिवाय नकली नोटा कशा ओळखाव्यात याबाबत रिझर्व्ह बँकेकडून जनजागृती केली जाते.
पोलीस कारवाई जप्त नोटांचा तपशील –
वर्ष – संख्या
२०१६ – २,२७२
२०१७ – ७४,८९८
२०१८ – ५४,७७६
२०१९ – ९०,५६६
२०२० -२,४४,८३४