लोकसत्ता टीम

चंद्रपूर: नीट परीक्षेच्या निकालात झालेल्या घोळाविरूध्द चंद्रपूर शहरात दोन हजार विद्यार्थी व पालक रस्त्यावर उतरले. यावेळी गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काळे कपडे लावून विद्यार्थ्यांनी मुक मोर्चा काढून केंद्र सरकारकडे न्याय देण्याची विनंती केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. नीट परीक्षेच्या निकालात झालेल्या घोळाची व गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली.

एनटीएच्यावतीने ४ जून रोजी नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे समोर आले आहे. ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. त्यामुळे या घोळाविरोधात चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनच्यावतीने मंगळवार १८ जून रोजी मोर्चा आयोजित केला. गांधी चौकातून या मोर्चाला सुरवात झाली व जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मुक मोर्चा धडकला. जवळपास दोन हजार विद्यार्थी व पालक या मोर्चात सहभागी झाले होते. निट विदाऊट चिट, ट्रान्सफरन्सी इन निट, आम्हाला न्याय द्या या आशयाचे फलक घेवून विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

आणखी वाचा-नागपूर : जलकुंभासाठी जााग दिली, पण पाणीही मिळाले नाही अन्…

देशभरातील २३ लाख विद्यार्थ्यांनी या सत्रात नीटची परीक्षा दिली आहे. या परीक्षेचा निकाल एनटीएच्यावतीने जाहीर केल्यानंतर देशात मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे, हरियाणा राज्यातील एका केंद्रावरील ८ विद्यार्थ्यांनी ७१८, तर सहा विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणे शक्य नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला. नीट परीक्षेचा पेपर अनेक ठिकाणाहून फुटणे, पैकीच्या पैकी गुण मिळणे, या प्रकारावर एनटीएकडून कुठलिही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. हा आमच्यासारख्या ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे अशी प्रतिक्रिया या मूक मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. लाखो रूपये खर्च करून आम्ही निटची शिकवणी लावली. मात्र निकालाने आमचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. असंख्य विद्यार्थी आज मानसिक तणावात आहेत, विद्यार्थी स्वत:च्या जीवाचे काहीही करू शकतात तेव्हा केंद्र सरकारने न्याया करावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

आणखी वाचा-कुतूहल : २१ जून वर्षातील सर्वात मोठा दिवस; जाणून घ्या वैशिष्ट्ये…

नीट परीक्षेत ग्रेस गुण देण्याचा प्रकार नाही. परंतु, एनटीएच्यवतीने वेळेचे अपव्यय हे कारण पुढे करून ग्रेस गुण दिले आहेत. यात अनेक विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण टाकण्यात आल्याची बाब उघडकीस झाली आहे. या परीक्षेचा निकाल अन्य दिवशी जाहीर करता आला असता. मात्र, संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी निकाल जाहीर केल्याने संशय बळावला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, ग्रेस गुणांची तपासणी करून संबंधित विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे असेही विद्यार्थी व पालकांनी सांगितले. या मोर्चात चंद्रपूर जिल्हा कोचिंग क्लासेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. अतिशय शांततेच्या मार्गाने निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

नीट-युजी परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या गोंधळामुळे आता या परीक्षेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. नीटमधून मुन्नाभाई डॉक्टर घडायला नको. त्यामुळे निषेध नोंदविण्यासाठी चंद्रपूरमध्ये हा मूक मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते. निटच्या विद्यार्थ्यांना न्याय हवा आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी व न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. -प्रा. विजय बदखल, अध्यक्ष, कोचिंग क्लासेस असोसिएशन, चंद्रपूर