चंद्रपूर: बाह्ययंत्रणेमार्फत सुरू केलेली कंत्राटी पदभरती रद्द करावी, ‘दत्तक शाळा योजना’ रद्द करण्यात यावी, परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे, यासह राज्य सरकारच्या खाजगीकरण व कंत्राटीकरणाविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. शिक्षण-नोकरी बचाव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. आक्रोश मोर्चा दीक्षाभूमी मार्गे जटपुरा गेट, गांधी चौक ते जटपुरा गेट, पाणी टाकी चौक मार्गक्रमण करीत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
आमदार सुधाकर अडबाले, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी नगरसेवक नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोधीया, माजी नगरसेवक सेवक पप्पू देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे , कुणाल चहारे यांच्यासह अनेक नेते यात सहभागी झाले होते. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने ६ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षण व विविध विभागात मनुष्यबळ बाह्ययंत्रणेमार्फत पुरविण्यात येणार असल्याचा शासन निर्णय जारी केला.
हेही वाचा… कोराडी मंदिर परिसरातील लाकडी प्रवेशव्दार कोसळले
राज्य सरकार नवी वेठबिगारी निर्माण करू पाहत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.