नागपूर : विदर्भात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा मात्र सुरू आहेत. गृह महाविद्यालयात सुरू असलेल्या या उन्हाळी परीक्षेमध्ये विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्याची पुनर्परीक्षा होणार नाही, अशा सूचना विद्यापीठाच्या आहेत. पूर परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नसताना तूर्तास विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित न केल्यास हजारो विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे.
नागपूर विद्यापीठाची उन्हाळी परीक्षा ही ८ जूनपासून सुरू आहे. विद्यापीठाने उन्हाळी परीक्षेमध्ये गैरहजर राहिल्यास त्याची पुनर्परीक्षाच होणार नाही असे परिपत्रक प्रसिद्ध केले होते. त्यात सध्या सर्वत्र पावसाने थैमान घातले असून पूरपरिस्थिती व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अशा परिस्थिती परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये धडकी भरली आहे. जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाही त्यांना पुन्हा संधी मिळणार नसेल तर त्यांची परीक्षा कधी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच पूर परस्थितीचा विचार करता विद्यापीठाने तूर्तास परीक्षा स्थगित करावी, अशी मागणी होत आहे.