नागपूर: ‘हिट ॲण्ड रन’ कायद्याची तूर्तास अंमलबजावणी होणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतरही या कायद्याच्या विरोधात ९ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ट्रकचालकांनी आंदोलन सुरू केले. परिणामी, विदर्भातील १५ हजारांवर ट्रकची चाके थांबली. या आंदोलनामुळे जीवनावश्यक वस्तूंसह इतर मालवाहतुकीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
देशाच्या मध्यभागी असल्याने नागपुरातून देशाच्या चारही दिशेला रोज हजारो ट्रक विविध वस्तूंची वाहतूक करतात. दरम्यान, नागपुरातील अनेक ट्रांसपोर्ट कंपनीतील चालकांनी कायद्याला विरोध करत सेवेवर येण्यास नकार दिला. त्यामुळे शनिवारी रात्री व रविवारी मालवाहतुकीच्या बऱ्याच फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
हेही वाचा – वैद्यकीय सचिवांकडून रॅगिंग प्रकरणाची दखल ! नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील प्रकरण
या आंदोलनात तूर्तास स्कूलबस आणि रुग्णवाहिकांचे चालक सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे सध्या नागपूरसह विदर्भात स्कूलबस आणि रुग्णवाहिकेच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही. पेट्रोल-डिझेलसह इंधन टँकरची वाहतूक करणाऱ्या चालकांनीही मंगळवारी रात्रीपर्यंत सेवा सुरू ठेवली. परंतु बुधवारी ट्रकचालकांचा संप बघून तेही आंदोलनात उतरल्यास इंधनाचा पुरवठा पुन्हा विस्कळीत होण्याचा धोका आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची सेवा तूर्तास सुरू असल्याचे बाबा ट्रॅव्हल्सचे संचालक बाबा डवरे यांनी सांगितले.
“केंद्र सरकारच्या हिट ॲण्ड रन कायद्याला विरोध करत ट्रकचालकांनी सेवेवर येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मालवाहतूक बंद होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करत हा कायदा रद्द करावा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे. असे घडले तर ट्रकचालकांमध्ये विश्वास वाढून आंदोलनासारखे प्रकार टळतील.” – कुक्कू मारवाह, अध्यक्ष, नागपूर ट्रक्स युनिटी असोसिएशन.