पोलिसांनी सचिन कुलकर्णीला ताब्यात घेतले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय परिसरात बॉम्बस्फोट करणार असून पोलीस आयुक्तांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी हा बॉम्बस्फोट हाणून पाडावा,’ अशी धमकी देणारे निनावी पत्र सक्करदरा पोलिसांना मिळाले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. धमकीपत्र गांभीर्याने घेत सक्करदरा पोलिसांनी सचिन कुलकर्णी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. कुलकर्णी हा महापारेषणमध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहे.

सक्करदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  २५ नोव्हेंबरला सक्करदरा पोलीस ठाण्याला एक निनावी पत्र मिळाले होते. ‘संघ मुख्यालय परिसरात बॉम्बस्फोट करणार,  पोलीस आयुक्तांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी हा हल्ला हाणून पाडावा,’ असे त्यात नमुद आहे.  पत्र मिळताच पोलीस दलात खळबळ उडाली. सक्करदराचे  ठाणेदार पाटील यांनी विशेष पथक स्थापन केले. पत्र आल्याच्या दिवसापासून ते पथक धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत होते. पोलीस उपायुक्तांच्या सायबर पथकातील कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून नागपुरातील झिरो माईल्स  पोस्ट ऑफिसमध्ये ते निनावी पत्र पेटीत टाकणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली. त्याने स्वत:चे नाव  सचिन कुलकर्णी असल्याचे सांगितले. त्याची पत्नी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्राचार्य आहे. त्याला वृद्ध वडिल असून त्याचे आईचे करोना काळात निधन झाले आहे. कुलकर्णी याने धमकीचे  पत्र लिहिल्याचा कबुली दिली.

हेही वाचा >>> नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीचे छापे; मध्य भारतात खळबळ

सध्या पोलीस कुलकर्णीची सखोल चौकशी करीत आहेत. ज्या दिवशी भट सभागृहात महापारेषण कंपनीचा कार्यक्रम आयोजित होणार होता, त्याच दिवशी स्फोट घडविणार असल्याचे पत्रात लिहिले होते. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांवर किंवा कार्यक्रमात सहभागी होऊ दिले नाही म्हणून  धमकीपत्र दिल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. 

‘मला पोलीस पकडू शकणार नाही’

संघ मुख्यालय उडवण्याच्या धमकीचे पत्र लिहिल्याने खळबळ उडेल. धमकीपत्र लिहिले तरीही पोलीस आपल्यापर्यंत पोहचू शकणार नाही. सकाळच्या सुमारास पत्रपेटीत पत्र टाकले तसेच गाडीचा क्रमांकही पुसून काढला . त्यामुळे पोलिसांच्या तपासात कधीच सापडू शकत नसल्याचा अतिआत्मविश्वास सचिन कुलकर्णी याला होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास करून कुलकर्णीला अटक केली.

हेही वाचा >>> वाघाने केली चक्क वनखात्याची तिजोरी रिकामी…

पोलिसांनी २५० सीसीटीव्ही फुटेज तपासले

संघ मुख्यालय उडविण्याच्या धमकीपत्राला आम्ही गांभीर्याने घेतले. सायबर पथक आणि ठाण्यातील अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस परीश्रम घेत शहरातील जवळपास २५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. सलग तपास सुरु होता. शेवटी धमकीपत्र टाकणाऱ्या सचिन कुलकर्णीला आम्ही ताब्यात घेतले. त्याने धमकीपत्र लिहिल्याची कबुली दिली असून पुढील तपास करीत आहेत, अशी प्रतिक्रिया सक्करदऱ्याचे ठाणेदार धनंजय पाटील यांनी दिली.