लोकसत्ता टीम
अमरावती : तीन दिवसांपूर्वी भाजपच्या खासदार नवनीत राणा यांना धमकीचे पत्र मिळाले होते, या प्रकरणाच्या तपासासाठी अमरावती पोलीस हैदराबादमध्ये दाखल झालेले असताना सोमवारी पुन्हा एकदा धमकीचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. धमकीचे हे पत्र देखील हैदराबाद येथून पाठविण्यात आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस पथक नवनीत राणा यांच्या येथील शंकरनगर परिसरातील निवासस्थानी पोहचले असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे.
तीन दिवसांपूर्वी प्राप्त झालेल्या पत्रातून नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचाराची धमकी देण्यात आली होती. हे पत्र स्पीड पोस्टद्वारे त्यांच्या घरी प्राप्त झाले होते. या प्रकरणी नवनीत राणा यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी अमरावती पोलिसांचे एक पथक हैदराबादमध्ये पोहचले असून त्यांनी तेथे चौकशी सुरू केली आहे.
आणखी वाचा-नक्षल चळवळीत वैवाहिक आयुष्य धोक्यात… दहा लाखांचे बक्षीस असलेल्या दाम्पत्याचे आत्मसमर्पण
तीन दिवसांपुर्वी पत्र पाठवणाऱ्याने स्वत:चे नाव आमिर असे लिहिले होते. त्याने १० कोटी रुपयांची खंडणीही मागितली होती. पाकिस्तान झिंदाबाद असेही लिहिले. पत्रात नवनीत राणा यांच्याबाबत अनेक आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले. तसेच त्यांचे पती रवी राणा यांच्याबद्दल अशोभनीय गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या. मी तुमच्या घरासमोर गाय कापेन, अशी धमकीही त्याने दिली होती.
नवनीत राणांना यापूर्वीही जीवे मारण्याची धमकी
महत्त्वाचे म्हणजे माजी खासदार नवनीत राणा यांना अशाप्रकारे धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मार्च महिन्यात नवनीत राणा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी धमकी देणाऱ्याने व्हॉटसअॅपवर एक ध्वनिफित पाठवून ही धमकी दिली होती. या ध्वनिफितमध्ये त्यांनी शिविगाळदेखील करण्यात आली होती. नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत अमरावतीतून उमेदवार बनवण्याबरोबरच भाजपने त्यांना गुजरातमध्ये स्टार प्रचारकही बनवले होते. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
आणखी वाचा-गडचिरोलीत कोट्यवधींचा धान बोनस घोटाळा?… भूमिहीन व्यक्तींच्या खात्यावर…
हैदराबाद येथील एका सभेत ८ मे रोजी नवनीत राणा यांनी ओवेसी बंधूना आव्हान दिले होते. जर हैदराबादमध्ये पोलिसांनी १५ सेकंद माघार घेतली, तर दोन्ही भाऊ (ओवेसी बंधू) कुठे गेले हे कळणारही नाही. राणांचे हे विधान २०१३ मध्ये अकबरुद्दीन ओवेसी यांनी दिलेल्या भाषणाला प्रत्युत्तर मानले गेले होते.