नागपूर : उंच भागावर असलेल्या वसाहतीमधील सांडपाणी फुटाळा तलावात येत असल्याने पाण्याची गुणवत्ता कमी झाली असून पाण्यात किडे आणि शेवाळ वाढले आहे. त्याचा फटका संगीत कारंजी या प्रकल्पालासुद्धा बसला आहे. या तलावाच्या संवर्धनासाठी फुटाळा वस्तीतील ३५० कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याबाबत विचार सुरू आहे.
येथे राहणाऱ्यांचे सांडपाणी तलावात येते. तसेच येथील काही कुटुंबांकडे म्हशी आहेत. त्यांचे मल-मूत्र तलावात सोडले जाते. एवढेच नव्हे तर म्हशीही तलावात उतरतात. यामुळे पाणी खराब झाले आहे. कारंजीसाठी तलावात पाण्याखाली टाकलेले वायर, पंप आणि इतर उपकरणांना शेवाळाने वेढले आहे. यामुळे यंत्रणा नीट काम करत नाही. या कारंजांसाठी ५०० हून अधिक वायर वापरले असून, प्रत्येक वायर हाताने स्वच्छ करता येणे शक्य नाही. सांडपाणी आणि जनावरांचे मलमूत्र तलावात येणे थांबवण्यासाठी आणि तलावाच्या संवर्धनासाठी फुटाळा येथील सुमारे ३५० कुटुंबीयांचे इतरत्र पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव आहे, असे माहिती नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले.
हेही वाचा – बालाघाट जिल्ह्यात हॉकफोर्ससोबतच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार; १४ लाखांचे होते बक्षीस
अनेकदा चाचणी, पण लोकार्पण नाहीच
फुटाळा तलावावरील संगीत कारज्यांचे अनेकदा सादरीकरण झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि विविध पक्षांचे राजकीय नेते तसेच देश-विदेशातील नागरिकांनी ते बघितले. परंतु त्याचे लोकार्पण झालेले नाही. याबाबत नासुप्रचे सभापती म्हणाले, येत्या डिसेंबरपर्यंत संगीत कारंजीचे लोकार्पण होऊ शकेल.