नागपूर : भाजपचे जेष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटींची खंडणी मागत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारा फोन कर्नाटक राज्यातील बेळगावमधून आला होता. त्यामुळे या धमकी प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. धमकी देणाऱ्याचे ठिकाण पोलिसांनी शोधले असून आरोपीला अटक करण्यासाठी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक बेळगावला रवाना झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेही वाचा >>> “१०० कोटी द्या, अन्यथा…” गडकरींना मिळालेल्या धमकीचे प्रकरण नेमके काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांच्या खामल्यातील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी तीन फोन आले. गडकरी यांना १०० कोटींची खंडणीची मागणी करण्यात आली. खंडणी न दिल्यास बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली गेली. या गंभीर प्रकरणात स्वत: पोलीस आयुक्तांनी लक्ष घातले. सायबरचे संपूर्ण पथक कामाला लावले. धमकी देणाऱ्याने कर्नाटकातील बेळगाव येथून फोन केला होता. त्याने इतर व्यक्तीच्या नावावर सीमकार्ड घेतले होते. नागपूर पोलिसांनी लगेच कर्नाटक पोलिसांशी संपर्क करीत बेळगावमधील ठिकाणी पोलीस पाठविण्यासाठी आणि तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यासाठी मदत मागितली. कर्नाटक पोलीस या प्रकरणी बेळगावात तपास करीत आहेत तर नागपुरातून गुन्हे शाखेचे पथक बेळगावसाठी रवाना झाल्याची माहिती आहे. लवकरच आरोपीला ताब्यात घेण्याचा दावा नागपूर पोलिसांनी केला आहे.