लोकसत्ता टीम
अमरावती : येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकावत अत्याचार करणाऱ्या आणि तिची निर्वस्त्र अवस्थेतील छायाचित्रे प्रसारीत करण्याची धमकी देत ६ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या आरोपीला नांदगावपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
कार्तिक संजीव पुसदकर (२०) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारीनुसार अमरावती शहरात राहणारी पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गेल्या १ ऑक्टोबरला आरोपीने पीडित मुलीला नांदगावपेठ येथील एका भाडेतत्वावरील सदनिकेत नेले, तेथे तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी आरोपीने पीडित मुलीचे निर्वस्त्र अवस्थेतील छायाचित्रे काढली. ती समाज माध्यमांवर प्रसारीत करण्याची धमकी देऊन तिच्याकडून १ लाख रुपये रोख आणि ८० ग्रॅम सोन्याचे दागिने असा ६ लाख रुपयांचा ऐवज उकळला. तिच्यावर अनेकवेळ अत्याचार करण्यात आले. त्यानंतरही त्याची मागणी कमी होत नव्हती.
आणखी वाचा-उत्साही कार्यकर्त्यांसोबत अजितदादांची कपडे खरेदी आणि चर्चा
आरोपीने पीडित मुलीकडे १० ते १२ लाख रुपयांची मागणी केली. आर्थिक आणि शारीरिक छळ असह्य झाल्याने अखेर पीडित मुलीने आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी नांदगावपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. आरोपीला २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.