नागपूर : प्राथमिक वेतन पथकाचे अधीक्षक नीलेश वाघमारे यांना बनावट शालार्थ आयडी प्रकरणात निलंबित करण्यात आल्यानंतर शुक्रवारी रात्री नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनाही सदर पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे एका शिक्षकाला मुख्याध्यापक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मुख्याध्यापक पुडके यालाही अटक करण्यात आली आहे. यानंतर पोलीस विभागाने पुन्हा एकदा कारवाई केली असून रविवारी तिघांना अटक केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास सदर पोलीस करत असून सायबर पोलीसही तपासात सहभागी झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यात २०१९ पासून सुमारे ५८० प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेबाबत तसेच, शालार्थ आयडी प्रदान करण्याच्या आदेशांची कोणतीही शहानिशा न करता, बनावट शालार्थ आयडी प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले.
अशाच एका प्रकरणात नरड यांना अटक करण्यात आली. आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून काम केले नसतानाही त्याला थेट मुख्याध्यापक बनवण्यात आले. पुडके याने नागपूर येथील एस. के. बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर यादवनगर या शाळेची बनावट कागदपत्रे तयार केली व त्या आधारावर नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने पुडके विद्यालय जेवताळा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा येथे मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली.
या संपूर्ण गैरव्यवहार प्रकरणात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील दोन कर्मचारीही सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात निलेश मेश्राम, अधिक्षक माध्यमिक शिक्षण विभाग, संजय दुधाळकर, शिक्षण उपनिरीक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालय, सुरज नाईक, वरिष्ठ लिपीक शिक्षण उपसंचालक कार्यालय असे तीन आरोपींची नावे आहे. त्यांच्यावर ४२०, ४६५, ४६८, ४७१,४७२ अशा कलमा लावण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांचा या सपूर्ण घोटाळ्यामध्ये मोठा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सायबर पोलीस विभाग हा संगणकावर कशा प्रकारे बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आली. यात कोणी प्रमुख भूमिका बजावली. बनावट कागदपत्रे तयार करण्यात कोण सहभागी होते? या सर्वच बाबींचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.