चंद्रपूर : तीन दिवसांपूर्वी जेरबंद केलेल्या वाघिणीचे दुरावलेले तीन शावक नियतक्षेत्र मूलमध्ये उमा नदीच्या परिसरात सापडले. शनिवारी (ता.१३) रात्री दीड वाजताच्या सुमारास वनविभागाला मोठे यश आले. वनविभागाचे अजय मराठे यांनी अचूक निशाणा साधला. शावकांना रात्रीच चंद्रपूर येथे वन्यजीव उपचार केंद्रात रवाना करण्यात आले. या आधी जेरबंद करण्यात आलेली वाघीण एक दिवसा आधीच नेण्यात आली होती.
मूल आणि सावली वनविभागामार्फत संयुक्त रित्या हे रेस्कू ऑपरेशन राबविण्यात आले. यासाठी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, शंभर वनकर्मचारी, विशेष व्याघ्र संरक्षक विभागाचे कर्मचारी, पन्नास कॅमेरे,तीन लाईव्ह कॅमेरे, एक ड्रोन कॅमेरे यांची नजर होती. तीन शावकांना पकडण्यासाठी उमा नदीचा परिसर, शेतशिवार, चितेगाव, मरेगाव येथे मागिल चार पाच दिवसांपासून दिवस रात्र ही मोहीम सुरू होती. हे विशेष. वाघीण आणि तीन शावक जेरबंद झाल्याने वनविभाग आणि शेतक-यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तीन जणांचा बळी घेणारी नरभक्षक वाघीणीला बुधवारी जेरबंद करण्यात आले होते.त्यानंतर तिचे तीन शावक दुरावल्या गेले होते. शावकांना पकडण्यासाठी चितेगावच्या उमा नदीच्या परिसरातच पिंज-यात वाघीणीला ठेवण्यात आले होते.
शेवटी वाघीणीला हलविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. शावक पकडणे वनविभागासाठी मोठे आव्हानात्मक काम होते.त्यासाठी शंभरच्या वर वनकर्मचारी, पन्नास कॅमेेरे, तीन लाईव्ह कॅमेरे आणि एक ड्रोन कॅमे-यांची नजर ठेवण्यात आली होती. शनिवारी रात्री नियतक्षेत्र मूल मध्ये उमा नदीच्या परिसरातील शेतशिवारात तीन शावक एकत्र असल्याचे मूल येथील वनविभाागाच्या कर्मचा-यांना लक्षात आले. त्यांनी लगेच वरिष्ठांना कळविले.
तीन शावके एकत्र रित्या नदीच्या काठावर फिरत होते.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे यांनी योग्य प्रमाणात डॉट दिल्या नंतर शुटर अजय मराठे यांनी अचूक रित्या निशाणा साधला. तीनही शावक सुरूक्षित आणि आरोग्याने उत्तम असल्याचे वनविभागाने सांगितले.त्यांना पकडल्यानंतर रात्रीच चंद्रपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलविण्यात आले.मुख्य वनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर,विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली चिचपल्ली वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे,सावली वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे यांनी संयुक्त रित्या ही मोहीम राबविली.नरभक्षक वाघीण आणि तीन शावके जेरबंद झाल्याने वनविभाग आणि परिसरातील नागरिक,शेतक-यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
चितेगाव,आकापूर,मरेगाव,मूल आणि एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणारी वाघीण आपल्या तीन शावकासोबत फिरत होती. तिने एमआयडीसी परिसरात मेंढपाळ निलेश कोरेवार,चितेगाव येथे युवा शेतकरी शेषराज नागोशे आणि मूल मध्ये मेंढपाळ मल्लाजी येग्गावार यांच्यावर हल्ला करून ठार केले होते.तसेच तीघांवर हल्ला करून जखमी केले होते.