बुलढाणा: भरधाव मालमोटरने धडक दिल्याने दुचाकीवरील तिघेजण ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली. मृतांमध्ये लष्करी जवानासह एक बालकाचा समावेश आहे. खामगाव तालुक्यातील आंबेटाकली ते बोरी अडगाव मार्गावरील बोरी अडगाव शिवार परिसरात मंगळवारी (दि. २८) रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. श्रीकांत सुरवाडे (२६), हार्दिक रोहित वानखडे (४), कल्पना सुरवाडे (३४) रा. बोरी आडगाव, अशी मृतांची नावे आहेत. यात पूजा रोहित वानखडे (२६) या गंभीर जखमी झाल्या आहे.
हेही वाचा >>> ब्रॉडग्रेज मेट्रो ऐवजी आता ‘वंदे मेट्रो’ ; १०० किलोमीटर अंतरावरील शहरे जोडण्याची संकल्पना
भारतीय लष्करातील जवान व काश्मीर मध्ये कार्यरत असलेला श्रीकांत सुरवाडे ( २६) हा सुट्टीवर आपल्या गावी बोरी अडगाव येथे आला होता. मंगळवारी हार्दिक रोहित सुरवाडे या चार वर्षीय बालकाची प्रकृती बिघडल्याने तो काकू कल्पना व वहिनी पूजा यांना दुचाकीने घेऊन लाखनवाडा आरोग्य केंद्रात जात होता.
दरम्यान बोरी अडगाव शिवार परीसरातील पुलाजवळ समोरून येणाऱ्या मालमोटरने दुचाकीला धडक दिली. यामुळे श्रीकांत, कल्पना व हार्दिक हे जागीच दगावले तर पूजा ही गंभीर जखमी झाली. प्रकरणी चालक आरोपी शेख सलीम शेख गफ्फार विरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा दाखल केला. या दुर्घटनेने सुरवाडे वानखडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बोरी आडगाव मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.