चंद्रपूर: झोपण्यासाठी गेलेल्या दिव्यांगी उमरे (१४) या मुलीच्या बोटाला ब्लॅकेटमध्ये असलेल्या भल्या मोठ्या जहाल विषारी मण्यांर सापाने चावा घेतला. गंभीर अवस्थेत मुलीला बेंदले रूग्णालयात दाखल करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सापाचे विष मुलीच्या अंगभर पसरल्याने प्रकृती अधिकच गंभीर झाली होती. मुलीला दोन दिवस कृत्रीम श्वसनप्रणालीवर ठेवण्यात आले होते. डॉ. आनंद बेंदले, डॉ. सुनिल दिक्षीत व हदयरोग तज्ञ डॉ. स्वप्नील पुणेकर या तीन डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करीत दोन दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर मुलींचा जीव वाचविण्यात यश आले. भूलतज्ञ, ऱ्हदयरोगतज्ञ हे तीन डॉक्टर दिव्यांगी हिचेसाठी देवदूत ठरले.

बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील दिव्यांगी उमरे ही १४ वर्षीय मुलगी घरी झोपण्यासाठी गेली असता, ब्लॅकेटमध्ये भला मोठा जहाल विषारी मण्यांर साप होता. दिव्यांगीने ब्लॅकेट अंगावर घेताच सापाने तिच्या हाताच्या बोटाला चावा घेतला. चावा घेताच मुलीने आरडा-ओरड केल्याने ही बाब कुटूंबियांच्या लक्षात आली. कुटूंबियांनी लगेच तिला स्थानिक डॉ. आनंद बेंडले यांच्या रूग्णालयात दाखल केले. दाखल करतेवेळी प्रकृती ठणठणीत होती. मण्यांर या जहाल विषारी सापाने तिच्या बोटाला चावा घेतल्यामुळे रक्तप्रवाहाव्दारे संपूर्ण शरीरभर विष पसरले होते. त्यामुळे ती काही वेळानंतर बेशुध्द पडली.

हेही वाचा… रब्बी हंगाम तोंडावर अन् कृषी विक्रेते संपावर; शेतकरी हतबल

डॉ. बेंडले यांनी क्षणाचाही विलंब न करतांना मुलींला अतिदक्षता विभागात दाखल करून कृत्रीम श्वसन पध्दती व व्हेंटीलेटरवर मुलींला ठेवले. संपूर्ण शरीरात विष पसरल्याने मुलींचे कुटूंबिय चिंतेत होते. डॉ. बेंदले यांच्यासह भूलतज्ञ डॉ. सुनिल दिक्षीत, हदयरोग तज्ञ डॉ. स्वप्नील पुणेकर यांनी मुलींवर दोन दिवस शर्थीचे प्रयत्न करीत उपचार केले. यावेळी दिव्यांगी हिला एकाच वेळी १०० एन्टी स्नेक इंजेक्शन लावण्यात आले.

हेही वाचा… नागपुरात आता ‘ट्रॅव्हल्स’च्या दर्शनी भागात चालकाचे छायाचित्र! राज्यातील पहिला प्रयोग

मेडीकल मध्ये केवळ ३५ इंजेक्शन उपलब्ध होते. मात्र तिरूपती मेडीकोजचे सतिश निंबाळकर यांनी धावपळ करून ५० इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून दिले. त्यानंतर मुलींच्या शरीरातील संपूर्ण विष काढण्यात आले. त्यानंतर मुलींने उपचाराला प्रतिसाद देण्यास सुरूवात केली. दोन दिवसानंतर मुलींची प्रकृती पूर्वपदावर येत असून अतिदक्षता विभागातून तिला सामान्य वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. मुलींची प्रकृती ठणठणीत झाली असून दिव्यांगी आता फिरायला लागली आहे. मुलींवर शर्थीचे प्रयत्न करून डॉ. आनंद बेंडले, भूलतज्ञ डॉ. सुनिल दिक्षीत, हदयरोग तज्ञ डॉ. स्वप्नील पुणेकर यांनी यशस्वी उपचार करून मुलींचे जीव वाचविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three doctors saved divyangis life after manyar snake bitten her in chandrapur rsj 74 dvr