चंद्रपूर:नातेवाईकांची भेट घेऊन, हॉटेलात जेवण करून वणी या स्वगावी परत जात असतांना समोरून येणाऱ्या ट्रकवर दुचाकी आदळून सतीश भाऊराव नागपुरे (५१), मंजुषा सतीश नागपुरे (४७) व माहिरा राहुल नागपुरे या तीन जणांचा मृत्यू झाला. अपघाताची ही दुर्देवी घटना नागपूर – चंद्रपूर मार्गावरील डाली पेट्रोलपंप समोर मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. मंगळवारी सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होती तर मावळत्या वर्षाला निरोप देत सर्व जण पार्टीत मस्त होते. मात्र याच वेळी वणी येथील नागपुरे कुटूंबावर दु:खाचा डोंगर काेसळला. हॉटेलमधून जेवण आटोपून दुचाकीने घरी जात असताना हायवेवर यु टर्न घेताना दुचाकी समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हेही वाचा >>> सायबर सुरक्षेसाठी आता ‘यूजीसी’चे अभियान, महाविद्यालयांना…
सदर घटना मंगळवार ३१ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास भद्रावती शहरा लगत चंद्रपूर- नागपूर हायवे वरील डॉली पेट्रोल पंप जवळ घडली. वणी तालुक्यातील रासाघोणसा येथील नागपुरे कुटुंब भद्रावती येथे नातेवाईकाकडे भेटीसाठी आले होते. दरम्यान भद्रावती शहरालगत नातेवाईकाच्या मालकीच्या हॉटेलमधे जेवण केल्यानंतर नागपुरे कुटुंब (एम.एच. २९ ए. झेड. ९९४९) या दुचाकीने आपल्या नातेवाईकाच्या घराकडे परत जात असताना हायवेवर यू टर्न घेताना समोरून येणाऱ्या (एम. एच.४० एके २०९५) या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मंजुषा सतीश नागपुरे यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर सतीश भाऊराव नागपुरे व माहिरा राहुल नागपुरे या दोन वर्षीय बालिकेचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. या अपघातात स्मायली कामतवार ही सात वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.
हेही वाचा >>> बुलढाणा: पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा, पण मित्रपक्षांचीही नजर
अपघाताच्या या घटनेनंतर ट्रक चालक नंदू चव्हाण रा. पुसद याला भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे. या अपघातामुळे नागपुरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मावळत्या वर्षाला निरोप देतांना व नवीन वर्षाचे स्वागत करतांना जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मद्यपींवर देखील कारवाईचे सत्र सुरूच होते. मात्र दुर्दवाने अपघाताची ही घटना घडल्याने नववर्षाच्या स्वागताला गालबोट लागले आहे. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.