बुलढाणा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मानवावर हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
बिबट्याच्या हल्ल्याची पहिली घटना शेगाव तालुक्यातील डोलारखेड शिवारात घडली आहे. यात सुरेश गजानन देठे (वय ३५) व एकनाथ दिनकर लोड (३२ वर्ष) हे दोघे जखमी झाले. गावकऱ्यांनी बिबट्याचा प्रतिकार करण्याचे धाडस दाखविले. मात्र, दोघांना रक्तबंबाळ करून बिबट पसार झाला. दोघांना तात्काळ खामगाव येथील उप जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आवश्यक असलेले इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.
हेही वाचा – जागतिक महिला दिनी क्रिकेटपटू उमेश यादवला कन्यारत्न
हेही वाचा – पंतप्रधान मोदी, अदानी विरोधात घोषणा देत काँग्रेसचे नागपुरात आंदोलन
दुसरी घटना नांदुरा तालुक्यातील हिंगणा इसापूर येथे घडली आहे. तिथे बिबट्याच्या हल्ल्यात एक युवक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे शेगाव व नांदुरा तालुक्यातील शेतकरी व गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. वन विभागाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.