अमरावती : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाची तेरा पैकी तीन दारे सोमवारी दुपारी १० सेंटिमीटरने उघडण्यात आली. त्यामधून ४७ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. गेल्‍या काही दिवसांपासून जिल्‍ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> वर्धा : सरपंचाची बनवाबनवी अन् विद्यार्थ्यांना मनस्ताप; जंगलात पायपीट, पोलिसांकडे तक्रार

अप्पर वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत, मोर्शीच्या उपविभागीय अभियंता मनाली नंदागवळी, कनिष्ठ अभियंता शुभम जयस्वाल यांच्या हस्ते धरण क्षेत्रातील पाण्याची विधीवत पूजाअर्चा करून १, ७ व १३ क्रमांकाची दारे उघडण्यात आली. जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सोमवारी धरणाची तीन दारे उघडण्यात आली. अप्पर वर्धा धरणाची जलपातळी जुलै अखेरपर्यंत ७४ टक्क्यांच्या खाली होती. मात्र, ५ ऑगस्ट रोजी पाणीसाठ्याची टक्केवारी ७८.५६ एवढी झाल्याने दारे उघडण्याची वेळ आली. अप्पर वर्धा धरणाची निर्धारित पाण्याची पातळी ३४२.५० मिलीमिटर एवढी ठेवण्यात आली आहे. सध्या ही पातळी ३४१.०९ मिलीमिटर झाली आहे. त्यामुळे जवळपास ७८.५६ टक्के धरण भरलेले आहे. धरणाची दारे उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा >>> उच्च शिक्षण सचिव आणि संचालकांना अवमानना नोटीस, नागपूर विद्यापीठातील बोगस पदवी घोटाळ्याशी असा आहे संबंध…

१४ धरणांमधून विसर्ग

अमरावती विभागातील अप्‍पर वर्धा, बेंबळा आणि पूस या मोठ्या प्रकल्‍पासह एकूण १४ धरणांमधून पाणी सोडण्‍यात येत आहे. बेंबळा प्रकल्‍पातून १७२ क्‍यूमेक, पूस प्रकल्‍पातून ४४.५७ क्‍यूमेक पाणी सोडण्‍यात येत आहे. मध्‍यम प्रकल्‍पांपैकी पूर्णा १४.२६ क्‍यूमेक, गर्गा १२८, अधरपूस ५२, सायखेडा ६९.३७, गोकी २३.७०, वाघाडी ३७.३४, बोरगाव ०.६८, घुंगशी बॅरेज ४३१, अडाण प्रकल्‍पातून ४०.६१, सोनल ०.१२० आणि पलढग प्रकल्‍पातून ५.७३ क्‍यूमेक विसर्ग सुरू आहे. विभागातील अनेक शहरे मध्‍यम प्रकल्‍पांमधील पाणीसाठ्यावर विसंबून आहेत. विभागातील एकूण ९ मोठ्या प्रकल्‍पांमध्‍ये ८६२.४७ दलघमी म्‍हणजे ६१.६१ टक्‍के, २७ मध्‍यम प्रकल्‍पांमध्‍ये ४९०.३५ दलघमी म्‍हणजे ६३.५४ टक्‍के, तर एकूण २५३ लघु प्रकल्‍पांमध्‍ये ४४७.९० दलघमी म्‍हणजे ४८.१२ टक्‍के पाणीसाठा झाला आहे. विभागातील सर्व धरणांमध्‍ये १८००.१२ दलघमी (५८.०४ टक्‍के) पाणीसाठा झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three gates of upper wardha dam opened after water level rise mma73 zws