अमरावती: गेल्या काही दिवसांपासून अमरावती विभागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून विभागातील तीन मध्यम प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे, तर दोन मोठ्या प्रकल्पांसह ८ प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे.
अमरावती विभागात एकूण ९ मोठे आणि २७ मध्यम असे ३६ प्रकल्प आहेत. अजून पावसाळा संपलेला नाही. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने येवा वाढत आहे. अशा स्थितीत नियोजनाचा भाग म्हणून धरणांमधील जादा पाणी सोडून देण्यात येते.
विभागातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात ४११.१८ दशलक्ष घनमीटर म्हणजे ७२.९० टक्के पाणीसाठा झाला असून जलाशय पातळी ही ३४०.६७ मीटरपर्यंत पोहचली आहे. सध्या धरणाचे ११ दरवाजे ८० सेंमीने उघडे आहेत आणि त्यातून १३३५घनमीटर प्रतिसेकंद पाणी सोडण्यात येत आहे.
बेंबळा प्रकल्पाच्या १२ दरवाजांमधून ६०० घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे. पश्चिम विदर्भातील २७ पैकी ३ मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. सहा मध्यम प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
हेही वाचा… स्वदेशी बनावटीची यंत्रणा सांगणार युद्ध विमानाचे नेमके स्थान; अंतिम चाचणीनंतर हवाई दलात होणार समावेश
या प्रकल्पांमध्ये सध्या ४११.५७ दलघमी (५३.३३ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. तर पश्चिम विदर्भात सर्व सिंचन प्रकल्पांमध्ये साठवण क्षमतेच्या १५१४ दलघमी (४९.१३ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. जोरदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील मध्यम प्रकल्पांपैकी यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, बोरगाव, अकोला जिल्ह्यातील उमा हे तीन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.
हेही वाचा… भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य शरद पवारांच्या गटात, राष्ट्रवादीत केला प्रवेश
अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा या मोठ्या प्रकल्पा सोबतच अमरावती जिल्ह्यातील पूर्णा, गर्गा, यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, बोरगाव, अकोला जिल्ह्यातील घुंगशी बॅरेज, वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे.