नागपूर: उपराजधानीत डेंग्यूचा प्रकोप कायम असतानाच ‘स्वाईन फ्लू’चाही विळखा घट्ट होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील विविध रुग्णालयांत दगावलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू ‘स्वाईन फ्लू’मुळे झाल्याचे मंगळवारच्या (७ नोव्हेंबर) मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत स्पष्ट झाले.
इनफ्लुएन्झाचे निदान झालेल्या व उपचारादरम्यान दगावलेल्या तीन रुग्णांचे प्रकरण मंगळवारी झालेल्या मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत ठेवले गेले. त्यात दोन रुग्ण नागपूर शहर तर एक रुग्ण मध्यप्रदेशातील छिंदवाड्याचा होता.
तज्ज्ञांच्या समितीकडून मृत्यूचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर तिघांचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे (एएच १ एन १) झाल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेकडून या रुग्णाच्या संपर्कातील लोकांची माहिती घेतली जात आहे. नवीन रुग्णांमुळे नागपूर शहरात आजपर्यंत आढळलेल्या स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या आता ६१ वर पोहचली आहे. त्यापैकी ४५ बरे झाले तर आठ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
हेही वाचा… नागपूर: कुख्यात गुन्हेगार शेख अफसरच्या घरातून ६ काडतूस जप्त
नवीन मृत्यूमुळे नागपूर शहरात आजपर्यंत स्वाईन फ्लूने दगावलेल्या रुग्णांची संख्या आता १० आणि एएच ३ एन २ मृत्यूंची संख्या १ तर जिल्ह्याबाहेरील स्वाईन फ्लू मृत्यूंची संख्या ५ आणि इनफ्लुएन्झा ‘ए’मुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या १ नोंदवली गेली आहे. या बैठकीत महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, मेयोच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे डॉ. रवींद्र खडसे, डॉ. गुंजन दलाल, डॉ. जितेंद्र भगत व खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
काळजी घ्या, आजार टाळा
“दगावलेल्या बहुतांश रुग्णांना सहव्याधी होती, असे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. त्यामुळे सहआजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. गर्दीत जाणे टाळावे, स्वाईन फ्लूचे एकही लक्षण असल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी. ” – डॉ. गोवर्धन नवखरे, साथरोग अधिकारी, महापालिका.