नागपूर : नागपूर जिल्हा काही दिवस करोनामुक्त राहिला असतानाच गेल्या तीन दिवसांत शहरात २ आणि ग्रामीणला १ असे एकूण तीन नवीन करोनाचे रुग्ण जिल्ह्यात आढळल्याने चिंता वाढली आहे. त्यापैकी एक ९४ वर्षीय रुग्ण हा रुग्णालयात दाखल आहे. नवीन रुग्णामध्ये सावनेरच्या एका ९४ वर्षीय वृद्ध, शहरातील ताजबाग परिसरातील ४० वर्षीय महिलेचाही समावेश आहे. दोघांचाही विदेशी प्रवासाचा इतिहास नाही. तर एका रुग्णाने करोना प्रतिबंधक लस घेतली असून इतर रुग्णांची माहिती काढण्याचे महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहे.
वय जास्त असल्याने एका रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या तिन्ही रुग्णाच्या संपर्कातील रुग्णांचेही नमुने करोना तपासणीसाठी घेण्यात आले आहे. या सगळ्यांच्या अहवालानंतर इतरांना विषाणूचे संक्रमण आहे काय? हे स्पष्ट होईल. दरम्यान नवीन रुग्णांमुळे शहरातील करोनाच्या आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या ४ लाख ५ हजार ८६६, ग्रामीण १ लाख ७१ हजार ५५६, जिल्ह्याबाहेरील ९ हजार ९९६ अशी एकूण ५ लाख ८७ हजार ४१८ रुग्णांवर पोहचणार आहे. तर आजपर्यंत शहरातील ३ लाख ९९ हजार ८०२, ग्रामीण १ लाख ६८ हजार ९२७, जिल्ह्याबाहेरील ८ हजार ३२८ असे एकूण ५ लाख ७७ हजार ५७ जण करोनामुक्त झाले आहे.