अमरावती : जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांत मोठी वाढ झाली असून त्यामध्ये ऑनलाइन आर्थिक फसवणूकीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. शहरातील दोन बेरोजगार युवकांसह तिघांची सायबर भामट्यांनी १९.५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
येथील प्रतीक गजाननराव चिकटे (३०, रा. गुरूकृपा कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एकूण चार आरोपींनी त्यांना टेलिग्राम आणि समाज माध्यमांवर खोटे संदेश पाठवून ऑनलाईन हॉटेल बुकिंगच्या अर्धवेळ नोकरीचे आणि चांगल्या पगाराचे आमिष दाखवले. सुरूवातीला त्यांना थोडा लाभ देखील मिळाला.
हेही वाचा…चंद्रपुरात ब्राऊन शुगरची विक्री, पोलिसांनी सापळा रचून…
नंतर आभासी लाभ दाखवण्यात आला. वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून ऑनलाईन रक्कम मागविण्यात आली. अशा पद्धतीने चार सायबर भामट्यांनी त्यांची १३ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत तब्बल १० लाख ३८ हजार ७४४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत एका युवकाची ४ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. तक्रारकर्ते हितेश संजय नानवाणी (२८, शिवकृपा कॉलनी) यांचा कापडाचा व्यापार आहे. त्यांच्यासोबत सायबर भामट्यांनी टेलिग्राम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपर्क साधला आणि ब्राईट ऑप्शन कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
हेही वाचा…उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गृह जिल्ह्यातून गांजाची तस्करी
सायबर भामट्यांनी त्यांना वेगवेगळ्या खात्यांमध्ये ४ लाख ३४ हजार ७१६ रुपये जमा करण्यास सांगितले. हा प्रकार १ जून ते २९ डिसेंबर २०२३ दरम्यान घडला. पैसे भरूनही नोकरी न मिळाल्याने हितेश यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. तिसऱ्या घटनेत परतवाडा येथील व्यापाऱ्याची ४ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
परतवाडा येथील व्यावसायिक घनश्याम अग्रवाल यांना केवायसी करण्यासाठी मोबाईलवर एक लिंक पाठविण्यात आली. त्यावर क्लिक केल्यानंतर अग्रवाल यांनी केवायसी प्रक्रिया सुरू केल्यावर त्यांना आधार क्रमांक नोंदविण्यास सांगण्यात आले. तो नोंदविताच त्यांना ओटीपी आला. हा ओटीपी त्यांनी लिंकवर टाकताच त्यांच्या खात्यातून ४ लाख ८४ हजार रुपये वळते करण्यात आले. त्यांनी परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.