नागपूर: रेती तस्करांना कारवाई करण्याचा धाक दाखवून वसुली करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले. यामध्ये नवीन कामठीचे वेदप्रकाश यादव आणि सुधीर कनोजिया तर मुख्यालयातील हवालदार पप्पू ताराचंद यादव यांचा समावेश आहे.
अमितेश कुमार यांनी लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुधारण्याची संधी दिली होती. तरीही अनेक पोलीस कर्मचारी अजूनही दारू विक्रेता, जुगार अड्डे संचालक, रेती तस्कर, सुपारी व्यापारी, लकडगंजमधील क्रिकेट सट्टेबाज, वरली-मटका आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडून पैसे उकळत होते. आयुक्तांकडे अनेक तक्रारी आल्यानंतर काही पोलीस कर्मचारी आयुक्तांच्या रडारवर होते. त्यात नवीन कामठीचा हवालदार पप्पू यादव हा १२ रेती तस्करांवर कारवाई न करण्यासाठी पैसे घेत होता. त्यामुळे त्याची पोलीस मुख्यालयात बदली केली होती.
हेही वाचा… सोन्याच्या दरात मोठी उसळी, आजचे दर पहा…
वसुली बंद झाल्यामुळे पप्पू यादवने नातेवाईक असलेला पोलीस कर्मचारी वेदप्रकाश मिश्रा आणि सुधीर कनोजिया यांच्याकडे अवैध तस्करांची यादी दिली. नवीन कामठीच्या ठाणेदारासाठी वेदप्रकाश आणि सुधीर हे दोघे वसुली करायला लागले. नवीन कामठीच्या डीबी पथकाची दर महिन्याला ४ लाखांची वसुली होत असल्याची तक्रार आयुक्तांंकडे आल्यानंतर पोलीस उपायुक्त श्रवण दत्त यांच्याकडे चौकशी देण्यात आली. चौकशीत तीनही पोलीस कर्मचारी अवैध वसुली करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. याच रेती तस्करांकडून गुन्हे शाखा पथकातील पोलीस कर्मचारीसुद्धा वसुली करीत होते. मात्र, त्यांना सूट देण्यात आल्याची चर्चा आहे.