लोकसत्‍ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : शहरातील शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने आता चंदन तस्करांचे लक्ष्‍य बनली आहेत. येथील मुख्‍य वनसंरक्षकांच्‍या कॅम्‍प येथील रॅलिज या शासकीय निवासस्थानाचा परिसर आणि एसडीएफ प्राथमिक शाळेच्‍या आवारातील तीन चंदन वृक्ष कापून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या मा‍हितीनुसार मुख्‍य वनसंरक्षकांच्‍या (प्रादेशिक) शासकीय निवासस्‍थान परिसरातील एक चंदनाचे झाड अज्ञात ५ ते ७ जणांनी कटर मशिनच्‍या साहाय्याने कापून चोरून नेले. याशिवाय या परिसरातील अन्‍य चार चंदनाच्‍या झाडांना आरा मारण्‍यात आला असून ही झाडे चोरीला जाण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच एसडीएफ प्रायमरी स्कूलच्‍या प्रांगणातील २ वृक्ष चोरट्यांनी चोरून नेली. या तीनही झाडांची किंमत सुमारे २० हजार रुपये इतकी आहे.

आणखी वाचा-‘एसीबी’चे महासंचालक पद रिक्त, प्रभारींच्या भरोश्यावर कारभार!

या प्रकरणी श्‍याम देशमुख यांच्‍या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्‍या विरोधात भादंवि कलम ३७९ अन्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू केला आहे. शहर व परिसरातील शासकीय निवासस्थानांच्‍या आवारातील चंदनाचे झाडे चोरी झाल्याचे प्रकार यापुर्वी घडले आहेत. यातील मोजके गुन्हे उघडकीस आले आहेत.

गेल्‍या वर्षी १५ एप्रिल रोजी चक्‍क पोलीस अधीक्षकांच्‍या कॅम्‍प परिसरातील निवासस्‍थानाच्‍या आवारातील २० फुटांचे चंदनाचे झाड कापून नेण्‍यात आले होते. अमरावतीत यापुर्वी महापालिका आयुक्‍त, विभागीय आयुक्‍त, वनविभाग कार्यालय, वडाळी नर्सरी, विदर्भ शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय परिसरातून चंदन तस्‍करांनी चंदनाची झाडे कापून नेल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत.

आणखी वाचा-नागपूर : प्रीपेड मीटरविरोधात जाहिर सभांचा धडाका! ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी…

चंदनाच्‍या लाकडाला मागणी असल्‍याने आणि त्‍याची किंमतही जास्‍त असल्‍याने चोरटे हे या वृक्षाच्‍या मागावर असतात. शहरातील शासकीय निवासस्‍थान परिसरांमध्‍ये चंदनाचे अनेक वृक्ष आहेत. ते वाचविण्‍याचे आव्‍हान आता पोलीस यंत्रणेसमोर आहे. अतिशय महागडे असणारी चंदनाची झाडे थेट अधिकाऱ्यांच्या बंगल्यातून चोरी जात असल्याच्या घटनेने वन विभागासह पोलीसही हतबल झाले आहेत. ज्यांच्याकडे जंगल, वन्यजीवांच्या सुरक्षेची जबाबदारी असताना ते स्वतःचे निवासस्‍थान सुरक्षित ठेवू शकत नाहीत, याची चर्चा रंगली आहे.

लाकूड तोडण्‍यात तरबेज असलेले चंदन तस्‍कर बॅटरीवर चालणाऱ्या कटरच्‍या साहाय्याने अवघ्‍या पाच ते दहा मिनिटांमध्‍ये झाड आडवे केल्‍यानंतर तुकडे करून पळवतात. काळ्या बाजारात चंदनाच्‍या खोडातील गाभ्‍याला सर्वाधिक भाव मिळत असल्‍यामुळे तस्‍कर जास्‍तीत जास्‍त जुने आणि जाड बुंध्‍याचे झाड तोडून खोड कापून नेतात. कर्नाटक राज्‍यात चंदनापासून सौंदर्य प्रसाधने तसेच अगरबत्‍ती, आणि अन्‍य वस्‍तू तयार करणारे कारखाने आहेत. त्‍या ठिकाणी हे लाकडू विकले जाते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three sandalwood trees from the residence area of chief conservator of forests were stolen by unknown thieves mma 73 mrj
Show comments