लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर: घरातील कामे न केल्यामुळे मोठ्या बहिणीने लहान बहिणीला एक थापड मारली. बहिणीच्या मारण्यामुळे राग अनावर झाल्याने मुलीने अन्य दोन बहिणींसह घरातून पलायन केले. तीन बहिणी अचानक बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, वाडी पोलिसांनी रात्रीचा दिवस करून तीनही मुलींचा मध्यप्रदेशात शोध घेतला. त्यांना सुखरुप पालकांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
वाडीतील द्रुगधामना वस्तीत वर्मा कुटुंब राहते. त्यांना चार मुली असून मोठी मुलगी १५ वर्षांची तर चवथी मुलगी अवघ्या ३ वर्षांची आहे. रविवारी पती-पत्नी दोघेही मोलमजुरीच्या कामावर गेले होते. दुपारी बारा वाजता त्यांची मोठ्या मुलीने १२ वर्षीय बहिणीला पाणी भरण्यास सांगितले तर ७ वर्षीय बहिणीला घरातील केरकचरा स्वच्छ करण्यास सांगितला. दोघींनीही काम करण्यास नकार दिला. त्यामुळे मोठ्या बहिणीने दोघींनाही कानशिलात लगावत काम करून घेतले. बहिणीने मारल्याचा राग अनावर झाल्याने दोघीही बहिणींनी घरातून पलायन करण्याचा निर्णय घेतला.
आणखी वाचा-नागपूर: गर्भवती तरुणीवर प्रियकर करायचा बलात्कार; प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न
रविवारी दुपारी दोन वाजता आईच्या डब्यातील २०० रुपये दोघींनी काढले. लहान बहिणीला कडेवर घेऊन ऑटोने थेट ऑर्डनन्स फॅक्टरीच्या (आयुध निर्माणी) प्रवेशद्वारासमोर पोहचली. तेथून एका खासगी बसने मध्यप्रदेशातील छत्तरपूर शहरातील तिकीट काढले. रात्री उशिरा तिघीही छत्तरपूरला पोहचल्या. दुसरीकडे सायंकाळी घरी आलेल्या आईवडिलांनी मोठ्या मुलीला बहिणींबाबत विचारणा केली. तिने खेळायला गेल्याचे सांगून वेळ मारून नेली. मात्र, रात्रीचे १० वाजल्यानंतरही मुली घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध सुरु केली. ११ वाजता वाडी पोलीस ठाण्यात पालक पोहचले. त्यांनी ठाणेदार प्रदीप रायन्नावार यांची भेट घेऊन प्रकार सांगितला. त्यांनी लगेच सीसीटीव्ही कॅमेरे आणि वायरलेसवर मॅसेज दिला. स्वतः ठाणेदार रायन्नावार यांनी दोन पथके तयार केली आणि मुलींचा शोध सुरु केला. मोठ्या बहिणीची आस्थेने चौकशी केली. बहिणींना मारल्यामुळे घरातून निघून गेल्याचे सांगितले, हे ऐकताच पोलिसांमध्ये खळबळ उडाली.
ऑटोचालक ते बस चालकांची झडती
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तिघीही एका ऑटोत बसताना दिसून आल्या. त्या ऑटोचालकाचा रात्री बारा वाजता शोध घेतला. त्याने ऑर्डनन्स फॅक्टरीजवळ सोडल्याचे सांगितले. तेथून ते बसमध्ये बसताना दिसल्या. त्यामुळे बसचालकाचा मोबाईल क्रमांक घेऊन माहिती घेतली. त्याने छत्तरपूरला सोडल्याचे सांगितले.
आणखी वाचा-नागपूरकरांनो सावधान! शहरात डोळ्यांची साथ; १०० पैकी २५ रुग्णांना संसर्ग, महापालिकेकडे केवळ…
धाकधूक आणि सुखरुप असल्याचा निरोप
छत्तरपूर येथे मुलींची मावशी राहत असल्याची माहिती आईने दिली. तिच्या मावशीचा मोबाईलवर फोन केला असती ती फोन उचलत नव्हती. त्यामुळे वाडी पोलिसांनी छत्तरपूर पोलिसांशी संपर्क साधत मुलींच्या मावशीच्या घराचा पत्ता काढला. तेथे तिनही मुली सुखरुप पोहचल्याचा निरोप मिळाला. तेव्हा वाडी पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. सध्या तिनही मुलींनी आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.