नागपूर : शहरात करोना रुग्णसंख्या वाढली असतानाच दुसरीकडे गेल्या दोन दिवसांत या आजाराच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली. या तिन्ही मृत्यूंचे प्रत्यक्ष कारण जाणून घेण्यासाठी लवकरच आरोग्य विभागाकडून मृत्यू विश्लेषण समितीची बैठक होणार आहे.
नागपुरात एम्समध्ये शुक्रवारी दाखल एका ६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याचे ‘लोकसत्ता’ने पुढे आणले होते. मध्य प्रदेशातील या रुग्णाला कर्करोगही होता. या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) करोना वॉर्डात शनिवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी एक ७१ वर्षीय रुग्ण हा वर्धा जिल्ह्यातील असून दुसरा १७ वर्षीय रुग्ण हा छिंदवाडा जिल्ह्यातील आहे. दोन्ही रुग्णांना सर्दी, खोकला, ताप, न्युमोनिया होता. या तीन रुग्णांच्या मृत्यूच्या वृत्ताला नागपूर महापालिकेतील एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

७८ टक्के रुग्ण शहरातील

नागपूर जिल्ह्यात १ जानेवारी ते ७ एप्रिल २०२३ दरम्यान सुमारे ४१८ नवीन करोनाग्रस्त आढळले. त्यातील ७८ टक्के रुग्ण हे शहरी भागातील तर इतर रुग्ण ग्रामीण भागासह जिल्ह्याबाहेरील होते. करोनाबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयात बैठक झाली.

२४ तासांत बाधितांची भर

शहरात शनिवारी २४ तासांत करोनाचे १४, ग्रामीण विभागात ६ असे एकूण २० नवीन रुग्ण आढळले. दिवसभरात शहरात २१, ग्रामीणला २ असे एकूण २३ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे शनिवारी शहरात २०१, ग्रामीणला ६९, जिल्ह्याबाहेरील १ असे एकूण २७१ सक्रिय करोनाग्रस्त नोंदवले गेले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three victims of corona in two days in nagpur amy