गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील हेटी येथील तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी नातेवाईकांनी शंका उपस्थित केल्याने पोलिसांनी २४ तासानंतर पुरलेला मृतदेह बाहेर काढला. मृत चिमुकलीच्या मोठ्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुलीच्या मृत्यूप्रकरणात तिची आईच संशयाच्या भोवऱ्यात आहे. मानसी ताराचंद चामलाटे (३ वर्षे) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
मानसी ही आई गुनिता ताराचंद चामलाटे हिच्यासोबत नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरातील नांदा येथे वास्तव्यास होती. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मानसीचा मृत्यू झाला. यावेळी मुलीचा मृतदेह घेऊन मानसीची आई स्वगावी पालेवाडा हेटी येथे आली. प्रकृती बरी नसल्याने मानसीचा मृत्यू झाला, असे तिने गावकऱ्यांना सांगितले. दरम्यान, शुक्रवारी दुपारी गावातील समशानभूमीत मानसीचा दफनविधी पार पडला. मात्र, नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर मृत मानसीची मोठी आई कलाबाई यांनी शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गोरेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी पुरण्यात आलेला मृतदेह बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी केटीएस रुग्णालय पाठवला. याप्रकरणी मृत मानसीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा…युवकाच्या हत्येमुळे मूल शहरात तणाव; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, अरोपीला अटक
मृत मानसी आई गुनीता चामलाटे हिच्यासोबत नागपूर जिल्ह्यातील नांदा परिसरात राहत होती. तिथेच तिचा मृत्यू झाला व शुक्रवारी मूळ गाव हेटी येथे दफनविधी करण्यात आला. मात्र, दफनविधी करतेवेळी मानसीच्या शरिरावर काही व्रण दिसून आले. यावरून तिच्या आईने केलेल्या मारहाणीमुळे किंवा इतर कारणाने तिचा मृत्यू झाला असावा, असा संशय तक्रारदार कलाबाई चामलाटे यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या (नागपूर ग्रामीण) हद्दीतील असल्याने हे प्रकरण तेथे वर्ग करण्यात आले आहे.