लोकसत्ता टीम

अकोला : नकली सोने खरे भासवत ते गहाण ठेऊन चक्क लाखो रुपयांचे कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे. फायनान्स कंपनीच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. नकली सोने खरे भासवून फायनान्स कंपनीला गंडा घालणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी मंगळवारी दुपारी गजाआड केले. नकली सोन्याच्या आधारे दोनदा फसवणूक केल्यानंतर तिसऱ्यांदा देखील ही टोळी कर्ज घेण्यासाठी आल्यावर जाळ्यात अडकली.

विजय महाजन हे मुथ्थुट फायनान्स कंपनीमध्ये शाखा अधिकारी म्हणून काम करतात. त्यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. १७ डिसेंबर २०२४ ला कंपनीच्या शाखेमध्ये आशुतोष पारसकर (२५ वर्षे, रा.मोठी उमरी अकोला) याने चार सोन्याचे अंगठ्या गहाण ठेऊन एक लाख कर्ज उचलले. त्यापैकी दोन सोन्याच्या अंगठ्या नंतर त्यांने सोडवून देखील नेल्या. ५० हजारांचे कर्ज बाकी होते.

त्यानंतर यश राजेंद्र उईके (२२ वर्षे, रा साई नगर वाडी खामगाव जि बुलढाणा), चेतन किशन अवताडे (२२ वर्षे रा.कारंजा लाड जि. वाशीम) हे दोन तरुण २२ ग्रॅम सोन्याची साखळी घेऊन कर्ज घेण्यासाठी आज शाखेत आले. त्यांची सोन्याची साखळी तपासली असता ती नकली असल्याचे उघडकीस आले.

त्यांना विचारणा केली असता त्यांनी आशुतोष पारसकर याच्याकडून सोन्याची साखळी आणल्याचे सांगितले. पारसरकर याने शाखेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्याची तपासणी केली असता त्या सुद्धा नकली निघाल्या. त्याला शाखेत बोलावून विचारपूस करण्यात आली.

त्याने सोन्याचे अंगठ्या रोहीत गोकटे (२८ वर्षे, रा. लहान उमरी, अकोला) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. गोकटे याने याआधी सुद्धा फायनान्स कंपनीमधून नकली सोने गहाण ठेवत दोन लाख ३७ हजारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात कलम ३१८(४), ३१८(२) ३ (५) भारतीय न्यांय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करून आशुतोष विजय पारसकर, यश राजेंद्र उईके, चेतन किशन अवताडे यांना अटक केली आहे. आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे, सपोनी नीलेश कंरदीकर, विजय चव्हाण, नितीन मगर, रोहीत पवार आदींच्या पथकाने केली.

Story img Loader