महाशिवरात्री यात्रेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून परत येत असताना वर्धा नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना वणी तालुक्यातील पाटाळा पुलावर आज शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
हेही वाचा >>> प्रवाशांना खुशखबर! पुणे ते अमरावती विशेष गाडी आठवड्यातून दोनदा धावणार
अनिरुद्ध चाफले (२२), हर्ष चाफले (१६) आणि संकेत नगराळे (२७) सर्व रा. विठ्ठलवाडी वणी, अशी मृतांची नावे असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. वणीतील विठ्ठलवाडी परिसरातील ११ तरुण आज महाशिवरात्रीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा येथे गेले होते. परत येताना यवतमाळ-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पाटाळा गावानजीक या तरुणांना वर्धा नदीत पोहण्याचा मोह झाला. यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून हे तरुण नदीत उतरले. हर्ष चाफले हा पोहताना बुडत असल्याचे लक्षात येताच अनिरुद्ध व संकेत त्याला वाचवायला गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोधमोहीम सुरू केली. वृत्त लिहिपर्यंत तिघांचाही शोध लागला नव्हता.