गडचिरोली: महाशिवरात्री निमित्त मार्कंडादेव येथील श्री. मार्कंडेश्वर मंदिरालगतच्या वैनगंगा नदीत पवित्र स्नानासाठी गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील तीन युवक बुडाले. यातील दोघांना वाचविण्यात यश आले, पण दुर्दैवाने एकास जलसमाधी मिळाली. २६ फेब्रुवारीला दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

अभिषेक संतोष मेश्राम (२४,रा. महाकाली वार्ड, चंद्रपूर) असे मयताचे नाव आहे. चामोर्शी तालुक्यातील श्री. मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी तो मित्रांसोबत आला होता. दर्शनापूर्वी तिघे साखरी घाटावर (चंद्रपूर जिल्हा हद्द) पवित्र स्नानासाठी गेले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. यानंतर इतर भाविकांनी आरडाओरड केली. भाविकांनी पाण्यात उड्या घेऊन जितू राजेश्वर दुर्गे (२०) , खुशाल सुखराम सोनवणे (१८) यांना वाचविले. मात्र, अभिषेक मेश्राम यालाही पाण्याबाहेर काढले, पण नाकतोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) पाच बचाव पथके नदीपात्रात तैनात होती, पण हे तिघे दूर अंतरावर स्नानासाठी उतरले, त्यामुळे त्यांना वाचविण्यात यश आले नाही.

अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

अभिषेक मेश्राम याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलिस निरीक्षक अमुल कादबाने यांच्या मार्गदर्शनात पो.ना. अविनाश कासशेट्टीवार तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी रणजित यादव, प्रभारी तहसीलदार अविनाश शेबटवार , नायब तहसीलदार राजू वैद्य यांनी घटनास्थळी भेट दिली.

Story img Loader