नागपूर : देशात एकीकडे भ्रमणध्वनी आणि ‘इंटरनेट बँकिंग’च्या सोयी वाढत असतानाच दुसरीकडे सायबर फसवणूकही वाढत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील शाखेत २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२२-२३ वर्षामध्ये तिप्पट वाढ झाल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.
स्टेट बँकेचे केंद्रीय जन माहिती अधिकारी व उपमहाव्यवस्थापक ईश्वरचन्द्र शाहू यांनी सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशभरात स्टेट बँकेत सायबर फसवणुकीचे २१ प्रकरण घडले. त्यात बँकेची २.७४ कोटींनी फसवणूक झाली. २०२१-२१ मध्ये येथे ३२९ प्रकरणांमध्ये बँकेची ४.४५ कोटी रुपयांनी तर २०२२-२३ या वर्षात ७२२ प्रकरणांमध्ये तब्बल ९.२३ कोटींनी फसवणूक झाली. त्यामुळे सायबर फसवणुकीचे प्रकरण स्टेट बँकेत वाढताना दिसत आहे. त्यातही सर्वाधिक सायबर फसवणूक ‘इंटरनेट बँकिंग’मध्ये झाली. २०२०-२१ मध्ये ४ प्रकरणात २.६४ कोटी, २०२१-२२ मध्ये २२४ प्रकरणांत ३.९१ कोटी, २०२२-२३ मध्ये ३३२ प्रकरणांत ६.२४ कोटींनी फसवणूक झाल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले.