अकोला : आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन स्थानकाचा थरार सलग तीन दिवस अनुभवता येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर अवकाशात या अंतराळ संशोधन स्थानकाचे दर्शन होणार असून खगोल प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरेल, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन स्थानक हे पृथ्वीभोवती फिरणारे एक मोठे अंतराळ स्थानक असून हे अंतराळात बांधलेले संशोधन केंद्र आहे. अंतराळवीरांसाठी निवासस्थान आणि संशोधन प्रयोगशाळा म्हणून काम करणारे हे स्थानक अंतराळात पाठवलेले सर्वात मोठे स्थानक आहे. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांचे अंतराळ संशोधन स्थानकावर केवळ एका आठवड्यासाठी अभ्यास व संशोधनासाठी जाण्याचे नियोजन होते.

मात्र, त्यांच्या स्टार लायनर या यानात तांत्रिक अडचणींमुळे त्यांना साडेनऊ महिने अंतराळ स्थानकात थांबावे लागले. अंतराळवीर विविध प्रकारच्या अभ्यास व संशोधनासाठी अंतराळ स्थानकात असतात. पृथ्वीवर परतल्यानंतर येथे ठराविक कालावधीपर्यंत त्यांचेवर विविध उपचार करून त्यांचे सुरळीत जीवन सुरू होते.

आकाशातील महाकाय आकाराचे हे अंतरा संशोधन स्थानक जगातील सर्वात महाग वास्तू असून त्याची उभारणी अनेक टप्प्यात केली जाते. सुमारे ४६० टन वजन व या ठिकाणी शून्य गुरुत्वाकर्षण असल्याने हवेत तरंगावे लागते. दरताशी सुमारे २८ हजार किलोमीटर वेगाने हे एक पृथ्वी प्रदक्षिणा दीड तासात या प्रमाणे रोज पंधरा ते सोळा वेळा पृथ्वी भोवती फिरते.

अंतराळ स्थानक जेव्हा आपल्या भागातून जाते, तेव्हा फिरत्या चांदणीच्या स्वरूपात ते नुसत्या डोळ्यांनी पाहता येते. या वेळेस ते बहुतांश महाराष्ट्रभर पाहता येईल. मुंबई ते नागपूर अंतर फक्त दीड मिनिटात ते पूर्ण करते. स्थल परत्वे वेळ, उंची आणि तेजस्वितेत बदल होतो. यावेळी हे सलग तीन दिवस निरभ्र आकाशात चांगल्या प्रकारे आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन स्थानकाचा थरार बघता येईल, असे प्रभाकर दोड म्हणाले.

केव्हा आणि कुठे बघाल?

२ एप्रिल, बुधवारीला सायंकाळी ७.२२ ते ७.२७ या वेळी उत्तरेकडून पूर्वेस जातांना स्थानक दिसेल. ३ रोजी गुरुवारी रात्री ८.१० ते ८.१४ यावेळी पश्चिमेकडून दक्षिणेकडे, तर ४ ला शुक्रवारी सायंकाळी ७.२० ते ७.२७ यावेळेस अधिक प्रकाशित असून ते वायव्येकडून दक्षिणेस जातांना दिसेल. या सर्व आकाश नजाऱ्यांचा मनसोक्त आनंद घेण्याचे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले आहे.