नागपूर : जंगलात वाघाला सावज हेरताना पाहणे हे प्रत्येकच पर्यटकांच्या नशिबात असत नाही. मात्र, ज्यांना हा अनुभव मिळतो तो थरारकच असतो. वाघ आपले सावज इतक्या सहजासहजी सोडत नाही. त्याची शिकार केल्यानंतरच तो शांत बसतो. वाघाला शिकार करताना पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो. अशाच एका वाघाच्या शिकारीचा अनुभव डेक्कन ड्रीफ्ट्सचे पीयूष आकरे यांनी घेतला आणि तो कॅमेराबद्ध देखील केला. अंगावर काटा आणणारा हा क्षण होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पात ‘लक्ष्मी’ नावाची ही वाघीण आहे, पण सावज हेरायचे असेल तर मात्र ती दुर्गेचा अवतार धारण करते. अवघ्या तीन ते चार वर्षांची ही वाघीण आहे. शिकार करण्यात ती अत्यंत तरबेज आहे आणि अगदी चित्त्याच्या वेगाने सावजाचा पाठलाग करुन जी सावज टिपते. तर बिबट्याप्रमाणे सावज घेऊन मोठ्या झाडांवर चढते आणि त्याठिकाणी शिकारीवर ताव मारते.

पेंच व्याघ्रप्रकल्पात ‘कॉलरवाली’ नावाची एक वाघीण होती, जी ‘सुपर मॉम’ म्हणून ओळखली जात होती. तिने अनेक बछड्यांना जन्म दिला. मध्यप्रदेशात वाघांची संख्या वाढवण्यात तिचे मोठे योगदान आहे, असे म्हटले तर खोटे ठरणार नाही. ती आता हयात नाही, पण या ‘कॉलरवाली’चे साम्राज्य असणाऱ्या अधिवासात आता ‘लक्ष्मी’ ही वाघीण राज्य करत आहे. पेंचमधील वाघांची संख्या वाढवण्यात ती देखील योगदान देईल, असे या व्याघ्रप्रकल्पात भेटी देणारे सांगतात. काही महिन्यांपूर्वीच ‘लक्ष्मी’ ही वाघीण तोंडात हरणाचे पिल्लू घेऊन पर्यटकांना दिसली. त्या शिकारीवर ताव मारण्यासाठी ती गुहेत शिरली.

महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील अनेक वाघांप्रमाणे मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पातील ‘लक्ष्मी’ अनेकदा पर्यटकांसमोर येते. ती अगदी बिनधास्त वावरते. कित्येकदा ती तिच्या बछड्यांसोबत देखील पर्यटकांना दर्शन देते. पेंच व्याघ्र प्रकल्प हे रुडयार्ड किपलिंगच्या ‘द जंगल बुक’ मधील मुख्य पात्र ‘मोगली’ या लांडग्या मुलाचे घर मानले जाते. मोगली आणि त्याच्या वन्य प्राण्यांच्या मित्रांचे नाव सर्व वयोगटातील लोकांच्या ओठांवर आहे. ‘मोगली’चे घर पाहण्याच्या इच्छेने देश आणि जगभरातून लोक पेंच राष्ट्रीय उद्यानात पोहोचतात. पेंच व्याघ्र प्रकल्प ११७९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापतो आणि तो सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यातील पेंच नदीच्या दरम्यान पसरलेला आहे. त्याचा ४११ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ संरक्षित क्षेत्र (कोअर एरिया) आहे.