’ शेतातील झाडे, उंचावरील मैदान, इमारती आकर्षणाची ठिकाणे
’ न्यायवैद्यकशास्त्रचे प्रा. डॉ. मनीष श्रीगिरीवार यांचे संशोधन
ढगांच्या घर्षणाने पृथ्वीवर पडणारी वीज सर्वाधिक उंच, झाडे, मैदाने, इमारती, तळे असलेल्या भागांकडे आकर्षित होते. मानवाला विजेचा स्पर्श होताच ती रक्तवाहिनीतून थेट हृदयावरच आघात करून ते बंद पाडते. त्यात मानवाचा तात्काळ मृत्यू होतो. नागपूरच्या सुप्रसिद्ध न्यायवैद्यकशास्त्राचे प्रा. डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी या विषयावर सतत चार वर्षे संशोधन केले. ३१ मृत्यूंवरील शवविच्छेदनाच्या अभ्यासातून हा निष्कर्ष पुढे आला. हे संशोधन ‘इंडियन अ‍ॅकेड फॉरेंसिक मेडिसीन’ या राष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
नागपूर जिल्ह्य़ात सन २००७ ते २०१० पर्यंत केलेल्या अभ्यासात पुढे आले की, ढगांमध्ये होणारी प्रक्रिया व दोन ढग एकमेकांवर जोरात आदळल्यावर त्याच्या घर्षणाने विजेचा कडकडाट होतो. याप्रसंगी विद्युत प्रवाह निर्माण होऊन तो थेट पृथ्वीच्या दिशेने येतो. विजेला उंच भागातील शेत, झाडे, पाण्याचे तळे, इमारती, बांधकाम सुरू असलेला भाग, मैदानी भाग जास्त प्रमाणात आकर्षित करतो. त्यामुळेच ही वीज सर्वाधिक या भागात पडते. नागपूर जिल्ह्य़ात अभ्यासाच्या काळात सर्वाधिक वीज ही उंच झाडे असलेल्या भागासह शेतात पडल्याचे पुढे आले. त्यामध्ये सर्वाधिक मृत्यूही नोंदवण्यात आले.
वीज अंगावर पडल्यावर संबंधित व्यक्तीला जोरदार धक्का लागतो. या व्यक्तीच्या शरीरावर जळाल्याच्या वा इतर जखमा आढळतात, काही प्रकरणात त्या दिसतही नाहीत. जखम नसलेल्या व्यक्तीच्या त्वचेवर एखाद्या रक्तवाहिनीत क्रिसमस ट्री सदृष्य चित्र बघून हा मृत्यू वीज पडल्याने झाल्याचे शोधण्याचे आवाहन न्यायवैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांवर असते. वीज ही मानवाच्या अंगावर समोरच्या भागातून पडण्याचे प्रमाण जास्त आहे. अभ्यासात एकूण ३१ मृत्यूंपैकी २९ जणांमध्ये जळाल्याच्या काळसर जखमा आढळल्या. १० मृतांच्या कानाचा पडदा फाटल्याने त्यातून रक्तस्त्राव झाल्याचे पुढे आले. १६ जणांचे केस जळाल्यासदृष्य तर २९ जणांचे वीज पडल्यावर कपडे फाटलेले वा जीर्ण झाल्याचे आढळले. काहीजणांच्या शरीराचे अंतर्गत अवयवही फाटल्याचे पुढे आले.
नऊजणांची त्वचा जळून काळसर पडल्याचे तर दोनजणांनी काही लोखंडी वस्तू घातल्याने त्यात चुंबकीय प्रवाह निर्माण झाल्याचे पुढे आले. अभ्यासात वीज पडलेल्या १०० पैकी किमान ५० जणांचा मृत्यू होत असल्याचे पुढे आले. नागपूर जिल्ह्य़ात सर्वाधिक वीज पडून मृत्यू होण्याच्या घटना जून महिन्यात आढळल्या. सगळ्याच मृत्यूमध्ये वीज पडल्यावर हृदय बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे पुढे आले. काही प्रकरणात रक्तवाहिनीत विजेचा प्रवाह आल्याने मेंदूला प्राणवायूचा पुरवठा कमी झाल्यानेही मृत्यू होत असल्याचे पुढे आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेतकऱ्यांचा सर्वाधिक मृत्यू
नागपूर जिल्ह्य़ात ढगांच्या घर्षणाने पडणाऱ्या विजेवरील अभ्यासात सर्वाधिक मृत्यू २७ शेतकरी वा शेतमजुरांचा झाल्याचे पुढे आले. त्यानंतर तीन विद्यार्थी, एक बांधकाम क्षेत्रातील कामगाराचाही मृत्यू झाला. अभ्यासात वीज ही उंच भागासह काही ठरावीक भागाकडे जास्त आकर्षित होते. तेव्हा वादळीवाऱ्यासह पाऊस पडताना नागरिकांनी या भागात जाण्याचे टाळावे वा सुरक्षित ठिकाणी जावे. अभ्यासात चार वर्षांत झालेल्या ३१ मृत्यूमध्ये १९ पुरूष व १२ महिलांचा समावेश होता. त्यात दहा वषार्ंखालील दोन मुलांचाही समावेश होता.
– प्रा. डॉ. मनीष श्रीगिरीवार
न्यायवैद्यकक्षेत्राचे तज्ज्ञ, नागपूर

वर्षांत ४५ दिवस वीज पडण्याचा धोका
‘सेंटर फॉर डिझास्टर मिटिगेशन अ‍ॅन्ड मॅनेजमेंट’ वेल्लोर या भारतातील विजेवर काम करणाऱ्या संस्थेचाही संदर्भ या अभ्यासात घेतला आहे. त्यात भारतातील वीज पडणाऱ्या अतिधोकादायक भागात नागपूरचाही समावेश असल्याचे पुढे आले. नागपूरला वर्षभरात तब्बल ४५ दिवस वीज पडण्याचा धोका आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thunder lightning direct strike on heart