Heavy Rain Warning In Maharashtra : मोसमी पावसाने आता राज्यात जोर धरला असून सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने आज विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भात मोसमी पावसाची घोषणा झाली, पण पश्चिम विदर्भ वगळता पूर्व विदर्भात पावसाने दडी मारली होती. गेल्या आठवड्याच्या अखेरीस पूर्व विदर्भातदेखील पावसाला सुरुवात झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा पाऊस मुसळधार नसला तरीही हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी सातत्याने कोसळत आहेत. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, राज्यातही पावसाला पोषक हवामान आहे. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने राज्याच्या किनाऱ्यालगत पुन्हा ढग जमा होऊ लागले आहेत. आज, एक जुलैला कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा – वर्धा : मुले हिरमुसली! शाळेच्या पहिल्या दिवशी नवा गणवेश मिळालाच नाही, योजनेचा फज्जा

विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नंदूरबार, धुळे, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान खात्याने या जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तर पुण्यातील घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्येही ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास असेल. अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. देशाच्या इतर भागातही मोसमी पावसाची प्रगती होत असून लवकरच मोसमी पाऊस देश व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – यवतमाळ : भरधाव कारची ट्रकला धडक; भीषण अपघातात चार जण ठार, एक गंभीर

ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. झारखंड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.२ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. गुजरातच्या किनाऱ्यापासून बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. येत्या दोन दिवसांत मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा, चंडीगड आणि पंजाबच्या आणखी भागात दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thunderstorm in vidarbha and heavy rain warning in maharashtra rgc 76 ssb