यवतमाळ: जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेले अवकाळी पावसाचे थैमान बुधवारी चांगलेच वाढले. बुधवारी रात्री यवतमाळ शहरात विजांचे तांडव अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला. मध्यरात्री व आज पहाटेसुद्धा बहुतांश भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. या वादळाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा तुटल्या, खांब कोसळले. त्यामुळे गेल्या १२ तासांपासून शहरातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी यवतमाळ, बाभूळगाव, आर्णी, उमरखेड तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले होते. बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास यवतमाळात मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस कोसळल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जवळपास पाऊणतास कोसळलेल्या या पावसाने शहरातील नाले तुंबून पाणी रस्त्यांवरून वाहू लागले. त्यामुळे रस्त्यांना नाल्यांचे रूप आले होते. अनेक ठिकाणी वादळामुळे झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी घरांवरील छपरे उडाली. जिल्ह्यात कालपर्यंत ८० घरांची पडझड झाली असून ३३ गावांमधील ६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

हेही वाचा… काय म्हणता..! महाराष्ट्रातील २० पैकी १३ मंत्र्यांवर गंभीर गुन्हे, भाजपच्या सात तर शिवसेनेच्या सहा मंत्र्यांचा समावेश

बुधवारी यवतमाळसह महागाव तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. वादळी पावसाचा दरदिवशी प्रत्येक तालुक्यात फटका बसत असल्याने नागरिक व शेतकरी त्रस्त झाले असून पिकांचे नुकसान होत असताना प्रशासनाकडून पंचनामे व मदतीसाठी कोणतीही हालचाल नसल्याने संताप व्यक्त होत आहे. आजही जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thunderstorm rain with lightning and gusty winds occurred in yavatmal city nrp 78 dvr
Show comments