अमरावती : प्रवाशांची तिकिटे तपासून पैसे उकळणाऱ्या एका तोतया तिकीट तपासनिसाला (टीसी) बडनेरा रेल्वे पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्याकडून पावती बुक, रोख व अन्य साहित्य असा एकूण १२ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज भय्यालाल मालवीय (३२) रा. पाचबंगला, बडनेरा असे अटक करण्यात आलेल्या तोतया तिकीट तपासनिसाचे नाव आहे. रविवारी रेल्वे पोलीस दलातील कर्मचारी नितेश प्रकाश शहाकार हे बडनेरा रेल्वेस्थानकावर कर्तव्य बजावत होते.
नवजीवन एक्स्प्रेस बडनेरा रेल्वेस्थानकावर आली. त्याचवेळी एका तिकीट तपासनिसाला संशय आल्याने याची माहिती त्यांनी नितेश शहाकार यांना दिली. नितेश शहाकार यांनी संबंधित तोतया टीसीला सर्वसाधारण डब्यातून खाली उतरवले. त्याची चौकशी केल्यावर त्याने आपले नाव राज भय्यालाल मालवीय असल्याचे सांगितले. नितेश शहाकार व त्यांच्या सहकाऱ्यांचा संशय बळावल्यावर त्यांनी राज मालवीयची तपासणी केली. यावेळी त्याच्याजवळ एक लाल आणि पांढऱ्या रंगाचे पावती बुक आणि काही पैसे आढळून आले. ओळखपत्राबाबत विचारणा केल्यावर त्याच्याकडे ते नव्हते. तो केवळ निळ्या रंगाची रिबीन गळ्यात टाकून फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ तोतया तपासनिसाला अटक केली.