अमरावती : तिकीट दरात सूट देऊन सर्वसामान्यांना विमान प्रवासाची संधी देणाऱ्या केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत अमरावती विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा सुरू झाली, त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, पण तिकिटाचे दर आवाक्याच्या बाहेर जात आहेत. यातून प्रवाशांची संख्या घटण्याची शक्यता वाढली आहे.

‘उडान’ योजना अर्थात ‘उडे देश का आम नागरिक’ ही योजना २०१६ मध्ये जाहीर झाली. देशांतर्गत (डोमेस्टिक) विमान प्रवास वाढावा, हा त्यामागील उद्देश होता. यामध्ये दुसऱ्या टप्प्यात अमरावती विमानतळाचा समावेश करण्यात आला, पण प्रत्यक्षात विमानसेवा सुरू होण्यास बरीच प्रतीक्षा करावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ गेल्या १६ एप्रिलला झाला. आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.

या विमानसेवेचे संचालन करणाऱ्या अलायन्स एअरने अमरावती ते मुंबई या प्रवासासाठी सामान्य तिकीट दर २१०० रुपये इतके ठेवले आहेत. पण, ही सवलत साधारणपणे पन्नास टक्केच प्रवाशांसाठी आहे. प्राधान्य क्रमांकाने बुकिंग करणाऱ्या मोजक्या ग्राहकांसाठी ही योजना आहे. उर्वरित प्रवाशांना वाढीव दराने तिकीट खरेदी करावे लागते.

सध्या किती आहेत दर?

अलायन्स एअरने प्रवाशांसाठी ‘सुपर सेव्हर’, ‘व्हॅल्यू’ आणि ‘फ्लेक्झिबल’ या तीन प्रकारांमध्ये तिकीट बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. येत्या २५ एप्रिलला प्रवास करायचा झाल्यास प्रवाशांना ‘सुपर सेव्हर’ प्रकारात ८ हजार ६१० रुपयांचे तिकीट दर आहेत. ‘व्हॅल्यू’ प्रकारात १० हजार ५०० रुपये आणि ‘फ्लेक्झिबल’मध्ये १७ हजार ८५० रुपये इतके दर दर्शविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे येत्या ३० एप्रिलपर्यंत प्रवास करायचा असेल, तर ८ हजार ६१० रुपये इतका दर आहे. २ मे पासून ३ हजार ८६४ रुपये इतके दर सध्या दर्शविण्यात येत आहेत. १६ जूनपासून दर थोडे कमी आहेत. २३ जूनपर्यंत प्रवाशांना २६२५ रुपये मोजावे लागतील. २५ जूनपासून २१०० रुपये या सामान्य दराने तिकीट उपलब्ध आहे.

मुंबईहून अमरावतीसाठी दुपारी २.३० वाजता विमान आहे, ते दुपारी ४.१५ वाजता अमरावती विमानतळावर पोहचते. अमरावतीहून मुंबईसाठी दुपारी ४.४० वाजता विमान आहे, ते मुंबईला सायंकाळी ६.२५ वाजता पोहचते. ही वेळ गैरसोयीची असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.