सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत कच्चेपार येथे गुरुवारी सायंकाळी पट्टेदार वाघाने बाबुराव लक्ष्मण देवतळे (५५) यांच्यावर हल्ला केला. रक्तबंबाळ अवस्थेत देवतळे यांना चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात आणण्यात येत असतांना प्रकृती अधिक गंभीर झाल्याने मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे देवतळे यांचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी गुरांना जंगलातून घराकडे आणत असतांना कच्चेपार बीटातील गट क्रमांक १४७ मध्ये दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला केला.
हेही वाचा >>>चंद्रपूर: टॅब वाटप, एकाच वेळी ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी आल्याने गोंधळ
त्याचवेळी कच्चेपार येथील शेतकरी संजय नैताम हे घराकडे परत येत होते. यांना ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली तर वाघाने गुराख्यावर हल्ला केल्याचे दिसून आले. याची माहिती भ्रमणध्वनीद्वारे गावात दिली. माहिती मिळताच वन अधिकारी व ग्रामस्थ घटनास्थळी आले. मूल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी बाबूराव यांना मृत घोषित केले. ही घटना ताजी असतांनाच पुन्हा पट्टेदार वाघाने कच्चेपार येथील नरेंद्र नानाजी पिपरे यांच्या घरच्या गोठ्यात शिरून बैलावर हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवारच्या मध्यरात्री घडली. गुरुवारी काही तासातच दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने कच्चेपार गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.