चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील डोमा येथील डोमडू रामाजी सोनवाने (६५) या गुराख्यावर वाघाने हल्ला करून घटनास्थळीच ठार केले. ही आज शनिवार १५ जुलैच्या सकाळी उघडकीस आली. दरम्यान, या एकाच आठवड्यात वाघाने तीन जणांना ठार केल्याने भीतीचे वातावरण आहे. डोमडू सोनवाने हा १४ जुलै रोजी नेहमीप्रमाणे कंपार्टमेंट नंबर ४७४ येथे गावातील जनावरे घेऊन चराईसाठी गेला होता.
अचानक पट्टेदार वाघाने जनावरावर झडप घातली. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात वाघाने गुराख्यावर हल्ला चढवून ठार केले. सायंकाळी जनावरे घरी पोहोचली, परंतु गुराखी घरी न आल्याने घरच्या व गावातील लोकांनी जंगलात शोध घेतला असता सोनवाने यांचा मृतदेह आढळून आला. काही अंतरावर गाईचा बछडा सुद्धा वाघाने खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला. वनविभागाने घटनास्थळ गाठून गुराख्याचा मृतदेह ताब्यात घेतला. वन विभागाने मृताच्या कुटुंबीयांना २५००० रुपयांची मदत केली.