वाहनाच्या धडकेत पुन्हा एक वाघ जखमी

राष्ट्रीय महामार्ग वन्यप्राण्यासाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे एक वाघ वाहनाच्या धडकेने जखमी झाल्याने स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. सातवर शनिवारी एका वाहनाच्या धडकेत वाघ जखमी झाला. आज रविवारी सकाळी चमू त्याच्या शोधासाठी जंगलात गेला असता वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे यांच्यावर जखमी वाघाने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. त्यांना आधी देवलापर प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर नागपूर येथे  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

शनिवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास प्रादेशिक वनक्षेत्रातलगतच्या हरणकुंडजवळ राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडून जाणाऱ्या वाघाला वाहनाने धडक दिली. त्यानंतर ते वाहन पुढे निघून गेले. घटनास्थळी रक्ताचे डाग होते. वन कर्मचाऱ्यांनी महामार्ग परिसरात १०० किलोमीटर अंतरावर वाघाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. रात्रीची वेळ आणि जंगल घनदाट असल्याने जखमी वाघाचा शोध घेता आला नाही.

यापूर्वीच्या घटना

याच परिसरात मानसिंहदेव अभयारण्याजवळ रस्ता ओलांडताना १६ जुलै २०१८ ला बिबटय़ाचा मृत्यू झाला होता. १६ डिसेंबर २०१८ ला देवलापारजवळ वाहनाच्या धडकेत बिबट जखमी झाला होता. गोरेवाडा येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आता वाघ जखमी झाला आहे.

Story img Loader