चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनच्या शिवनी वनपरिक्षेत्रात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला. ही घटना सोमवारी (दि.२०) दुपारी उघडकीस आली. वाघांच्या मृत्यूंच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रेल्वेच्या धडकेत एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ४८ तासांच्या आत आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याने वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ताडोबा बफरमधील शिवनी वनपरिक्षेत्राच्या पांगडी नियतक्षेत्रात दीड वर्षीय वाघ वनकर्मचाऱ्यांना मृतावस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने तेथे पोहोचले. या भागात एक वाघीण आपल्या ४ बछड्यांसह वावरत होती. याच परिसरात दोन मोठे वाघ असून दोन आठवड्यांपूर्वी त्यातील एका वाघासोबत झालेल्या झुंजीत हा बछडा जखमी झाला होता. त्याच्यावर ताडोबा बफर विभागाचे नियमित लक्ष होते. त्याच्यावर उपचारही करण्यात आले होते.

हेही वाचा >>>“अजितदादांनी प्रथम न्याय देण्याचे कार्य करावे,” संतोष देशमुख कुटुंबीयांची अपेक्षा

सोमवारी त्याच बछड्याचा मृतदेह आढळून आला. संध्याकाळ झाल्याने मृत वाघाचे शवविच्छेदन मंगळवारी चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये केले जाणार आहे. बछड्याचे सर्व अवयव शाबूत असून हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.

महाराष्ट्रातील नऊ वाघ मृत्युमुखी

देशात मागील १९ दिवसांत एकूण १५ वाघांचा मृत्यू झाला आहे, तर महाराष्ट्रातील नऊ वाघही मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्रातील नऊ व्याघ्र मृत्यू हे विदर्भातील जंगलात झाले आहेत.

हेही वाचा >>>बुलढाणा :ग्रामीण भागात रोजगाराची तीव्रता वाढली, ‘रोहयो’कडे मजुरांचा ओढा…

वनाधिकाऱ्यांचे म्हणणे काय?

शिवणी वनपरिक्षेत्रात दीड वर्षांच्या वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. तो जखमी होता, त्याचेवर उपचार करण्यात आले होते. त्याचे सर्व अवयव शाबूत असल्याने हा नैसर्गिक मृत्यू आहे, अशी माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर उपसंचालक पीयुशा जगताप यांनी दिली.

Story img Loader