नागपूर : गोंदिया वनखात्याअंतर्गत कोहका-भानपूर मार्गावर वाघाचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ही माहिती मिळताच वनखात्याचे पथक घटनास्थळी पोहोचले.
नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्राबाहेरचे हे क्षेत्र आहे. ज्याठिकाणी वाघाचा मृत्यू झाला, तो वाघांचा कॉरिडॉर आहे. वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, वनखात्याचे पथक व स्वयंसेवी घटनास्थळी पोहोचले असून ते वाघाच्या मृत्यूमागील नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत. दरम्यान, १४ दिवसातील हा सहाव्या वाघाचा मृत्यू आहे.
हेही वाचा – साहित्याच्या मांडवात राजकारण्यांची ‘सरबराई’!
राज्यात एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना अवघ्या १४ दिवसांत सहा वाघ मृत्यूमुखी पडले. २०२३च्या तुलनेत २०२४ मध्ये राज्यात वाघांच्या मृत्यूचा आलेख ५० टक्क्यांनी खाली होता. मात्र, आता पुन्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वाघांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अभयारण्य किंवा व्याघ्रप्रकल्पाच्या बाहेर हे मृत्यू झाले आहेत. यातील काही मृत्यू संशयास्पद आहेत. यवतमाळच्या प्रकरणात वाघाचे दात आणि नखे गायब आहेत. तर भंडाऱ्याच्या प्रकरणात चक्क वाघाचे तुकडे सापडले. दरम्यान, या पाच वाघांपैकी दोन मृत्यू हे अवघ्या पाच ते सहा महिन्यांच्या बछड्यांचे आहेत.
हेही वाचा – दृष्टिहीन ‘भूमिका’ची वाचनाप्रती डोळस भूमिका! सलग १२ तास ब्रेल लिपीतील…
वाघांचे मृत्यू, केव्हा व कुठे?
२ जानेवारी २०२५ – चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात शेतातील नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळला. सर्व अवयव शाबूत असले तरीही मृत्यू संशयास्पद.
६ जानेवारी २०२५ – भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्राअंतर्गत घनदाट जंगलात वाघाचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे तीन तुकडे करून जंगलात फेकण्यात आले.
७ जानेवारी २०२५ – यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील उकणी येथील खुल्या कोळसा खाणीच्या मुख्य मार्गावर वाघाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. वाघाचे दोन दात आणि १२ नखे गायब होते.
८ जानेवारी २०२५ – नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगत प्रादेशिक वनविभागात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला. दहा दिवसांपासून त्याच्या पोटात अन्न नसल्याने उपासमारीने त्याचा मृत्यू.
९ जानेवारी २०२५ – चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मूल बफर क्षेत्रात वाघिणीच्या पाच ते सहा महिन्यांच्या बछड्याचा मृतदेह आढळला. मोठ्या वाघाने या बछड्याला मारल्याचे निदर्शनास आले.
१४ जानेवारी २०२५ – गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाबाहेर कोहका-भानपूर मार्गावर वाघांच्या कॉरिडॉरमध्ये एका उपवयस्क वाघाचा मृत्यू उघडकीस आला.