नागपूर : देशातील वाघांच्या जन्मदराच्या तुलनेत त्यांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. वर्षांच्या अखेरीस वाघांच्या मृत्यूची पुढे आलेली आकडेवारी आणि त्याचवेळी सरकारी तसेच गैरसरकारी संस्थांच्या आकडेवारी यांतील तफावतीमुळे व्याघ्रप्रेमी संभ्रमात पडले आहेत.
‘राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणा’च्या संकेतस्थळावर वर्षभरात देशात एकूण १६८ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे, तर ‘वाईल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया’च्या (डब्ल्यूपीएसआय) संकेतस्थळावर २०१ वाघांचा मृत्यू झाल्याचे दर्शवण्यात आले आहे. ‘टायगर टास्क फोर्स’च्या शिफारशीनंतर २००५मध्ये भारतातील व्याघ्र प्रकल्पांच्या निर्मितीसाठी आणि व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. ‘डब्ल्यूपीएसआय’ ही देशभरातील अवैध वन्यजीव व्यापार आणि शिकारीला आळा घालण्यासाठी स्थानिक समुदाय आणि सरकारी संस्थांबरोबर काम करून भारतातील वन्यजीवांचे संवर्धन करण्यासाठी काम करणारी ही विश्वसनीय संस्था आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांच्या संकेतस्थळांवर दिलेल्या वाघांच्या मृत्यूची आकडेवारीतील तफावतीमुळे व्याघ्रप्रेमी संभ्रमात पडले आहेत. या दोन्ही संस्थांच्या आकडेवारीत ३३ वाघांच्या मृत्यूचा फरक आहे.
हेही वाचा >>> चारित्र्याच्या संशयावरून बहिणीशी झाला वाद, भावाने बहिणीचा गळा आवळून केला खून
महाराष्ट्रात सर्वाधिक..
वाघांची सर्वाधिक संख्या मध्य प्रदेशात आहे. याच राज्यात वाघांचा मृत्युदरही जास्त आहे. तर व्याघ्रसंख्येत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असताना मृत्यूच्या संख्येत मात्र तो पहिल्या स्थानावर आहे.
वाघांचे अस्तित्व आणि मृत्यू याच्या शासनाने अचूक नोंदी ठेवणे आवश्यक आहे. ब्रिटिश काळातही तशा शास्त्रशुद्ध आकडेवारीच्या नोंदी ठेवण्यात येत असत. व्याघ्रसंवर्धनासाठी ध्येयधोरणे ठरवताना या नोंदी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे त्यात तफावत असू नये.
– यादव तरटे पाटील, माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ