लोकसत्ता टीम
वर्धा : वाघांचे वाढते मृत्यू ही आता चिंतेची बाब ठरू लागली आहे. या उमद्या प्राण्याच्या संरक्षणाचे उपाय पण हतबल ठरू लागत असल्याचे दिसून येते. त्यातच अपघातात नाहक बळी जाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. आज सकाळी अश्याच अपघातात एका वाघाचा बळी गेला. रस्त्यावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. माहिती होताच वन खात्याचे वरिष्ठ घटनास्थळी हजर झाले आहेत. अज्ञात वाहनाने ठोस दिल्याने हा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुळात वन खाते एक महिन्यापासून मागावर होते. एक वाघीण व तिचे तीन शावक गिरड, खुरसापार परिसरात फिरत असल्याची माहिती पुढे आली होती. वाघिणीने दोन पशुचा फडश्या पडल्यानंतर परिसरातील गावकरी भयभीत झाले होते. त्यापैकीच हा एक शावक असल्याचे म्हटल्या जात आहे. कारण अपघातात ठार वाघ हा चार महिन्याचा असल्याचे सांगण्यात आले. आता घटनास्थळी उपस्थित सहायक वन संरक्षक अमरजीत पवार यांनी यांस पुष्टी दिली. पहाटे अज्ञात वाहनाची धडक बसल्याने वाघ बळी गेल्याचे ते म्हणाले. वाघीण व तिचे तीन बछडे या बद्द्ल परिसरात चांगलेच कुतूहल निर्माण झाले होते. तसेच हल्ल्यात गाय ठार झाल्याने दहशत पण पसरली होती.
आणखी वाचा-विकास प्रकलपांना शेतजमिनी देणारी गावे ओसाड
गिरड शिवारात या कुटुंबाचा मुक्त संचार सूरू असल्याने सर्वच सतर्क झाले. या शावकास सुरक्षित ठेवण्यासाठी वन विभाग नाना प्रयत्न करीत होतेच. रात्री वेळी जनावरापासून पिके सुरक्षित ठेवण्यासाठी काही शेतकरी विजेचा प्रवाह सोडतात. त्यात या पिल्लांचा बळी जाऊ नये म्हणून रात्रीचा वीज पुरवठा खंडित करण्याची विनंती विद्युत विभागास करण्यात आली. तसेच वीस ट्रॅप कॅमेरे सुद्धा लावण्यात आले होते. प्रत्येक हालचाल टिपल्या जात आहे. त्यात वाघीण व तीन पिल्ले दिसून आलीत. तेव्हापासून वन अधिकारी गस्त घालत आहे. वनपरीक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांनी खुरसापार, गिरड, पेठ, आर्वी, फरीदपूर, मोहगाव येथील शेतकरी व नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते. सर्व ती काळजी घेत असतांनाच आज पहाटे हा प्रकार घडला. राष्ट्रीय महामार्गावर गिरड क्षेत्रात धोंडगाव ते मुनेश्वर नगर दरम्यान हा अपघात घडला आहे. जिल्हा वनसरक्षक हरवीर सिंग हे पण घटनास्थळी दाखल झालेत.