चंद्रपूर : शिकारीसाठी शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहित कुंपणाला स्पर्श झाल्याने वाघाचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत येत असलेल्या सिंदवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा माल येथील एका शेतात घडली.

मेंढा माल येथील शेतकऱ्यांना शेतात जात असताना वाघाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पथकाने तपासणी केली असता, शिकारीसाठी लावण्यात आलेल्या विद्युत प्रवाहित कुंपणाचा स्पर्श झाल्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. मृत वाघ अडीच ते तीन वर्षे वयाचा आहे. ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. शालिनी लोंढे, डॉ. सुरपाम यांनी शवविच्छेदन केले.

हेही वाचा – गडचिरोली : “तोडगट्टा आंदोलकांना दिलेले आश्वासन पूर्ण करा”, नक्षल्यांचा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना पुन्हा एकदा इशारा

हेही वाचा – “विरोधकांमुळेच लोकशाही धोक्यात”, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची टीका; म्हणाले…

यावेळी वन्यजीवप्रेमी यश कायरकर, एन.टी.सी.ए प्रतिनिधी बंडू धोतरे, मानद वन्यजीव सरंक्षक विवेक करंबेकर, पंकज माकोडे, यांच्यासह सहाय्यक उपवनसंरक्षक चोपडे, वनपरिक्षेत्राधिकारी विशाल सालकर उपस्थित होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करून वनविभागाने तपास सुरू केला आहे.