नागपूर : मोहर्ली वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र सितारामपेठ अंतर्गत येत असलेल्या भामडेळी गावालगत इरई धरण परिसरात गस्त करीत असतांना आज (सोमवारी) एक वयस्कर वाघ मृतावस्थेत आढळून आला. सदर घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक संकेत वाठोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष विपे, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य धनंजय बापट, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण प्रतिनिधी बंडू धोतरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रतिनिधी मुकेश भांदककर, डॉ. कुंदन पोडचेलवार पशु वैद्यकीय अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, डॉ. पुरुषोत्तम कडूकर सेवा निवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग, मिलिंद जक्कुलवार, पशु वैद्यकीय पर्यवेक्षक, मोहर्ली तसेच वनपाल व क्षेत्रीय वनरक्षक व पंचासह उपस्थित घटनास्थळी पाहणी केली. सदर वाघाची ओळख पटली नसून त्याचा मृत्यू हा अंदाजे १५-२० दिवसापूर्वी झालेला असावा. ३१ मार्चला शेतकरी यांनी शेतातील पुंजाने जळण्यासाठी लावलेल्या आगीमध्ये इरई धरण परिसरातील गवताळ भागसुद्धा जळलेला आहे.

मृत वाघाचे नखे, दात, हाडे, शाबूत असून आगीमुळे अर्धवट जळाल्याचे दिसून आले. सदरची आग ही वाघाच्या मृत्यू नंतर लागलेली आहे. कारण मृत देहाच्या बाजूला मास सडल्यानंतर लागलेल्या अळ्या सुद्धा जळाल्याचे दिसून आले. सदर मृतदेहाचा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून नमुने गोळा करून उत्तरीय तपासणीमध्ये मृत वाघाच्या मृत्यूचे कारण आणि मृत वाघाचे अवयवाचे नमुने ओळखीसाठी सीसीएमबी हैदराबाद येथे पाठविण्यात येणार आहेत.

सदर परिसरामध्ये १६ मार्च पर्यंत नियमितपणे टी-२४ व तिचे तीन बछडे दिसून येत होते. फेब्रुवारी २०२५ पासून बछडे दोन वर्षाचे झाल्याने  या वाघिणीपासून स्वतंत्र झाले होते. १६ मार्च पासून सदर वाघिण दिसून न आल्याने शोध घेणे सुरु होते. मृत वाघ हा टी-२४ असण्याची शक्यता असू शकते. सदर प्रकरणी वनगुन्हा नोंद करण्यात आला असून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक व शसहाय्यक वनसंरक्षक संकेत वाठोरे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थीपे पुढील तपास करीत आहे.