नागपूर : मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगतच्या एका ‘रिसॉर्ट’मध्ये ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी अचानक वाघ दाखल झाला आणि तिथेच तो पाय पसरून झोपी गेला. ‘रिसॉर्ट’ मध्ये दाखल होताच त्याने डरकाळी फोडली आणि पुन्हा तो झोपी गेला. मात्र, त्याची ही डरकाळी ‘रिसॉर्ट’मध्ये आराम करणाऱ्या पर्यटकांना चांगलीच हादरवून गेली. त्या वाघाने मस्तपैकी ताणून दिल्याचे पर्यटक मात्र ‘रिसॉर्ट’मध्येच अडकले. अखेरीस वनखात्याच्या चमूला त्याठिकाण पाचारण करावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील तुरिया गावातील एका शेतात रात्रीच्या वेळी सुमारे १६ ते १८ महिन्यांचा वाघ दिसला. मानवी वस्तीच्या अगदी जवळ असल्याने पेंच व्याघ्र प्रकल्पाचे गस्ती पथक रात्रीपासून त्यावर लक्ष ठेवून होते. मात्र, रात्री तीन वाजण्याच्या सुमारास हा वाघ अंधारात गस्ती पथकांच्या नजरेतून गायब झाला.

हेही वाचा…नागपूर : चक्क वाघाचाच रस्ता अडवण्याचा प्रकार! ताडोबात हे चालले तरी काय?

वाघाची डरकारी अन् पर्यटकांची घाबरगुंडी…

यानंतर गस्ती पथकांनी पहाटे पुन्हा या वाघाचा शोध सुरू केला असता तुरिया गावाजवळील एका ‘रिसॉर्ट’मध्ये तो आराम करताना दिसून आला. जंगलातून बाहेर आल्यानंतर ‘रिसॉर्ट’मध्ये विसावलेल्या वाघाने डरकाळी फोडताच पर्यटक हादरले. वास्तविक, सोमवारी रात्री पेंच व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडलेल्या वाघाने रिसॉर्टमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे पर्यटक रिसॉर्टमध्येच अडकले. माहिती मिळाल्यानंतर बचाव पथक त्याठिकाणी पोहोचले. मुख्य वन्यजीव रक्षक सुभरंजन सेन यांना तेथील परिस्थितीची माहिती देण्यात आली. त्यानंतर वाघाला जेरबंद करण्यासाठी परवानगी देण्यात आली.

पेंच व्याघ्रप्रकल्पात सोडले

पेंच व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अखिलेश मिश्रा यांनी हत्तींच्या मदतीने वाघाजवळ जाऊन त्याला शांत केले आणि जेरबंद करून खवासाच्या वन्यजीव वैद्यकीय केंद्रात आणले. बचावादरम्यान, जबलपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वन्यजीव फॉरेन्सिक आणि आरोग्य केंद्राच्या डॉ. निधी राजपूत यांनी वाघाचे रक्त आणि इतर नमुने तपासणीसाठी घेतले. सर्व तपासणीनंतर त्या वाघाला पुन्हा पेंच व्याघ्रप्रकल्पात सुखरुप सोडण्यात आले.

हेही वाचा…चंद्रपूर : पर्यटकांच्या खिशाला कात्री! ताडोबा व्याघ्र सफारी व पर्यटन महागले…

रिसॉर्टमध्ये जाण्यामागील कारण काय?

वयात येऊ लागलेला हा वाघ स्वत:चा हक्काचा अधिवास शोधण्याच्या तयारीत होता आणि यादरम्यानच तो अधिवासाच्या शोधात रिसॉर्टपर्यंत पोहोचला. महाराष्ट्रात देखील रिसॉर्टच्या परिसरात वाघाने त्याचा मोर्चा वळवल्याचे चित्र कित्येकदा दिसून आले आहे. मात्र, हे घातक आहे. यातून पर्यटकांचा आणि वाघाचा दोघांचाही जीव धोक्यात येऊन शकतो. वाघांची संख्या सगळीकडेच वाढली आहे आणि व्याघ्रककेंद्रीत पर्यटन देखील वाढले आहे. त्यामुळे वाघ बाहेर पडत आहेत. या व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रातच पर्यकांसाठी रिसॉर्ट उभे राहत असल्याने आधी गावाकडे आणि आता रिसॉर्टकडे वाघांनी मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger enters resort in pench tiger reserve triggers panic among tourists on rakshabandhan rgc 76 psg