वाघाचे एकत्र कुटुंब दर्शन तसेच दुर्मिळच, पण ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात काहीच दुर्मिळ नाही. फक्त त्यासाठी नशीब मात्र जोरावर असायला हवे. वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी हा वाघांचा सहकुटुंब सोहोळा मनसोक्त अनुभवलाच नाही तर तो कॅमेऱ्यात कैद देखील केला.
हेही वाचा- लग्नाच्या दिवशीच विवाह प्रमाणपत्र मंडपात..! नवदाम्पत्य मारताहेत महापालिकेत चकरा
वाघिणीला बछडे झाले की जबाबदारी संपली, अशा अविर्भावात वाघ तिच्यापासून दूर होतो. त्यानंतर त्या बछड्यांच्या पालनपोषणाची सर्व भार त्या वाघिणीवर असतो. त्याला शिकार करण्यास शिकवण्यापासून तर स्वत:चा अधिवास निवडण्यापर्यंत सर्व जबाबदारी वाघीण पार पाडते. वाघ त्यांच्यापासून कोसो दूर असतो. त्यामुळे वाघ-वाघीण आणि बछडे असे एकत्रित कुटुंब फार क्वचितच दिसून येते. उन्हाळ्यातही तहानलेले हे प्राणी आपआपल्या सोयीनुसार पाणवठ्यावर येतात. व्याघ्रप्रकल्प असो वा अभयारण्य किंवा संरक्षित क्षेत्र, येथे नैसर्गिक पाणवठे तर असतातच, पण वन्यप्राण्यांची तृष्णा भागवण्यासाठी कृत्रिम पाणवठे देखील तयार केले जातात.
हेही वाचा- नागपूर : प्रवाशांची अव्वाच्या सव्वा भाडे आकारून लूट; उपराजधानीत ऑटोरिक्षांचे ‘मीटर डाऊन’
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील कोलारामधील पाणवठ्यावर तहानलेला ‘डागोबा’ हा वाघ आणि ‘जुनाबाई’ ही वाघीण त्यांच्या दोन बछड्यांसह एकत्रच तहान भागवताना दिसून आले. वाघ, वाघीण आणि बछडे एकत्रीत दिसणे दुर्मिळच, पण इंद्रजित मडावी यांना मात्र ते दिसले आणि मग त्यांनाही हे कुटुब कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आवरला नाही.