नागपूर : अधिवासासाठी, अधिकार क्षेत्रासाठी दोन वाघांमध्ये तुंबळ लढाई झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत. मात्र, याच कारणासाठी एका मोठ्या वाघाने लहान वाघाला जीवानिशी ठार मारल्याचे आणि एवढेच नाही तर मारल्यानंतर त्याच्या शरीराचे लचके तोडल्याची घटना कदाचित पहिल्यांदाच घडली असावी. या घटनेमुळे वनखात्यातील अधिकारीच नाही तर वन्यजीव अभ्यासक देखील चक्रावले आहेत. वाघाची ही वर्तणूक अनपेक्षित, अनाकलनीय, अविश्वसनीय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रात बोटेझरी नियातक्षेत्रात सोमवारी अर्धवट खाल्लेला वाघाचा एक ते सव्वा वर्षाचा बछडा दिसून आला. या घटनेने सारेच चक्रावले. कारण आजपर्यंत वाघाने इतर प्राण्यांची शिकार करून अर्धवट खाल्लेले प्राण्यांचे मृतदेह जंगलात अनेकदा आढळून आले. मात्र, याठिकाणी चक्क वाघाचाच अर्धवट खाल्लेला मृतदेह आढळून आला.अशाप्रकारची ही कदाचित पहिलीच घटना असावी. अतित्वाच्या लढाईत वाघ एकमेकांशी भिडतात. यात एखाद्याचा मृत्यूही होतो. मात्र, याठिकाणी चक्क एका वाघाने दुसऱ्या वाघाला खाल्ले. या परिसरात वाघीण आणि तिच्या तीन बचड्यांचा वावर होता.

त्यातील नर बछड्याला एका वाघाने खाल्ले. तब्बल दीडशे मीटर डांबरी रस्ता ओलांडून ओढत नेले. त्या बछड्याचा पाय त्या वाघाने वेगळा केला होता. बछड्याचे जवळजवळ २५ ते ३० टक्के शरीर त्या मोठ्या वाघाने खाल्ले होते. वाघाचा अर्धवट तुटलेला पाय दिसल्यानंतर वनकर्मचा-यांनी घटनास्थळ गाठुन परिस्थितीची माहिती वरिष्ठ अधिका-यांना दिली. घटनास्थळाची पाहणी केली असता, वाघाचे शव कक्ष क्रमांक ३५६ राखीव वनातील नाल्याच्या काठाला आढळले. त्यानंतर लगेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणच्या आधारभुत मानक प्रणालीनुसार कार्यवाही करण्यात आली.

दुपारी २.३० वाजता डॉ. भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, मनोज अ. धनविजय, सहायक वनसंरक्षक उमरेड उपविभाग आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांचे प्रतिनीधी कुंदन हाते, मानद वन्यजीव संरक्षक रोहीत कारू घटनास्थळी होते. डॉ. समर्थ, पशुवैद्यकिय अधिकारी, उमरेड, गिरीष गभने, पशुवैद्यकिय अधिकारी, भिवापुर, डॉ. राजेश फुलसोंगे, पशुवैद्यकिय अधिकारी ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्र यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर परिसराची कसुन तपासणी करण्यांत आली. प्राथमिक अंदाजानुसार वाघाची शिकार झालेली नसावी. वाघाचे सर्व अवयव जसे-कातडी, नखे, सुळे दात, इतर दात, पाय, शेपुट, मिश्या, पुर्णपणे साबुत आहेत. तसेच कातडी/बाहेरील अंगावर कुठलेही विद्युत प्रवाहाचे खुणा दिसुन आल्या नाही.

वाघाच्या शरिरामधला भाग खाल्याचा दिसुन आला. तसेच वाघाला १०० ते १५० मीटर फरफटत ओढत नेल्याचे दिसुन आले. यावरून वाघाच्या झटापटीमुळे वाघ दगावला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यांत आलेला आहे. सदर वाघ हा नर असुन तो १५ ते १८ महिण्याचा असल्याचा अंदाज वर्तविण्यांत आला आहे. याप्रकरणी वनगुन्हा नोंदविण्यांत आलेला असुन, पुढील तपस मनोज अ. धनविजय, सहायक वनसंरक्षक उमरेड उपविभाग, उमरेड हे करीत आहेत.